सांगलीत ऐन पाडव्यादिवशी पालकमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने, पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट
By संतोष भिसे | Published: October 28, 2022 07:17 PM2022-10-28T19:17:31+5:302022-10-28T19:19:10+5:30
आशा व गटप्रवर्तकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरु केली आहेत.
सांगली : दिवाळी भाऊबीज व वेतनवाढीसाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या घरासमोर आंदोलन करु पाहणाऱ्या गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना पोलीसांनी अडवले. त्यांची झटापटही झाली. यावेळी खाडे घरामध्ये नव्हते.
आशा व गटप्रवर्तकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरु केली आहेत. शासकीय सेवेत कायम करा, कामावर आधारित मोबदला दुपटीने वाढवा, किमान वेतन, मातृत्वकालीन रजा द्या अशा मागण्या केल्या आहेत. मुंबईत मंत्रालयावर काढलेल्या मोर्चावेळी दिवाळीपूर्वी निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले होते. पण त्यांनी आश्वासन न पाळल्याने गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी ऐन दिवाळीत पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी ओवाळणी कार्यक्रम जाहीर केला होता. ते मुंबईला गेल्याने निदर्शनांचा निर्णय घेतला. मात्र पोलीसांनी कडे करुन आंदोलकांना अडविले. त्यामुळे पोलीसांशी आंदोलकांची झटापट झाली.
आंदोलकांच्या घोषणाबाजीनंतर सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी मध्यस्थी केली. निवेदन स्विकारले. पालकमंत्र्यांशी चर्चेसाठी वेळ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व उमेश देशमुख, मीना कोळी, हणमंत कोळी, लता जाधव, सुरेखा जाधव, शबाना आगा, सुवर्णा सणगर, सीमा गायकवाड, अरुणा कदम, वैशाली पवार, वर्षा ढोबळे, रेशमा शेख,वर्षा देशमुख आदींनी केले.