‘उद्योगाचे विमान गुजरातला, बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला’, युवक राष्ट्रवादीच्यावतीने सांगलीत निदर्शने
By अविनाश कोळी | Published: October 31, 2022 04:26 PM2022-10-31T16:26:24+5:302022-10-31T16:26:48+5:30
महाराष्ट्रावर सतत वक्रदृष्टी
सांगली : राज्यातील अनेक मोठे उद्योग गुजरात व अन्य राज्यात जात असल्याने महाराष्ट्रातील युवकांचा हक्काचा रोजगार हिसकावून घेतला जात आहे, असा आरोप करीत युवक राष्ट्रवादीच्या वतीने सोमवारी सांगलीत राज्य शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली.
वसंत कॉलनीतील राष्ट्रवादी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. ‘उद्योगाचे विमान गुजरातला, बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला’ असा फलक झळकवित घोषणा देत कार्यकर्ते सहभागी झाले होते. पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे- फडवणीस सरकार करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला रोजगार अन्य राज्ये हिसकावून घेत आहेत. केंद्रातील भाजप सरकारला केवळ गुजरातचेच भले करायचे आहे. महाराष्ट्रातील जनतेशी त्यांचे काही देणे-घेणे नाही. त्यामुळे महाराष्ट्रावर सतत वक्रदृष्टी ते ठेवतात. त्यामुळेच येथील अनेक मोठे उद्योग पळविण्यात आले आहेत. आम्ही या सर्व गोष्टींचा निषेध करीत आहोत, असे म्हटले आहे.
यावेळी विनायक हेगडे, महालिंग हेगडे, आशुतोष धोतरे, अक्षय अलकुंटे, सुमुख पाटील, प्रफुल्ल जाधव, धर्मेंद्र कोळी, अरूण चव्हाण, सुशांत काळे, राहुल यमगर, आदर्श कांबळे, सचिन सगरे, अमिन शेख, आदित्य नाईक, अमित चव्हाण, राजू कांबळे, राहील मुल्ला, वाजिद खतीब आदी सहभागी झाले होते.