‘पीएफआय’विरोधात सांगलीत हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने
By अविनाश कोळी | Published: September 27, 2022 07:09 PM2022-09-27T19:09:00+5:302022-09-27T19:10:41+5:30
सांगली : पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या पीएफआय या संघटनेविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शिवप्रतापभूमी ...
सांगली : पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या पीएफआय या संघटनेविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन संघटनेच्यावतीने मंगळवारी सांगलीत निदर्शने करण्यात आली.
संघटनेचे प्रमुख माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेविका स्वाती शिंदे, अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात निदर्शने करण्यात आली.
यावेळी नितीन शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या देशविरोधी संघटनेच्या कार्यालयावर संपूर्ण देशभर छापे टाकले आहेत. त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. पुण्यातील या संघटनेच्या काही सदस्यांना अटक केल्यानंतर त्याविरोधात या संघटनेच्या पुण्यातील देशद्रोही समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले.
देश विरोधी कृत्य करणाऱ्या गद्दारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी. या संघटनेवर कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली. आंदोलनात शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.