मैत्रेयच्या मालमत्ता विकून पैसे द्या; गुंतवणुकदारांची सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By संतोष भिसे | Published: October 2, 2023 05:03 PM2023-10-02T17:03:43+5:302023-10-02T17:05:38+5:30
राज्यभरातील सुमारे दोन कोटी १६ लाख ठेवीदारांचे पैसे अडकले
सांगली : मैत्रेय कंपनीत पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांनी सोमवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. कंपनीच्या मालमत्ता विकून गुंतवणुकदारांना परतावे त्वरित मिळावेत अशी मागणी केली. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यांना गती देण्याची कार्यवाही करावी अशी मागणीही केली.
खटला रेंगाळण्यासाठी कारणीभूत व्यक्तींना अटक करावी, कंपनीचा सर्व्हर व फॉरेन्सिक रिपोर्ट न्यायालयात सादर करावा, कंपनीच्या वसई येथील मुख्यालयासह राज्यभरातील कार्यालयांच्या जागा विकून पैसे जमा करावेत, आजवर मालमत्तांमच्या विक्रीमधून मिळालेले पैसे गुंतवणुकदारांच्या खात्यांत त्वरित जमा करावेत, अन्य मालमत्तांची विक्री प्रक्रिया गतीने पूर्ण करावी अशा मागण्या आंदोलकांनी निवेदनाद्वारे केल्या.
राज्यभरातील सुमारे दोन कोटी १६ लाख ठेवीदारांचे पैसे कंपनीमध्ये अडकले आहेत. ते परत मिळण्यासाठी सकारात्मक कार्यवाही झाली नाही, तर जानेवारीपासून राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा गुंतवणुकदारांनी दिला.
आंदोलनात विनायक चव्हाण, गंगाधर तोडकर, प्रमोद इनामदार, डॉ. गणपती हरपनहळ्ळी, निलिमा कुष्टे, सुप्रिया तोडकर, यासीन सय्यद आदी सहभागी झाले. शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन दिले.