मिरज सिव्हिलमध्ये प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:20 AM2021-06-01T04:20:24+5:302021-06-01T04:20:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : लातूर येथे कोरोनामुळे प्रशिक्षणार्थी डाॅक्टराच्या मृत्यूप्रकरणी मिरज सिव्हिलमध्ये कोविड रुग्णसेवा करणाऱ्या प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांनी काळा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : लातूर येथे कोरोनामुळे प्रशिक्षणार्थी डाॅक्टराच्या मृत्यूप्रकरणी मिरज सिव्हिलमध्ये कोविड रुग्णसेवा करणाऱ्या प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांनी काळा दिवस पाळून सर्व प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्याची मागणी केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आंतरवासिता डॉक्टर्सनी डॉ. राहुल पवार यांना श्रद्धांजली व प्रशासनाने त्यांच्या कुटुंबाला ५० लाख आर्थिक मदत देण्याची मागणी करीत काळा दिवस पाळून निदर्शने केली. एका ऊसतोड कामगाराचा मुलगा डॉ. राहुल पवार हे लातूर येथे प्रशिक्षणार्थी डाॅक्टर म्हणून कोविड रुग्णसेवा करीत असतांना त्यांचा कोविडने मृत्यू झाला. डॉ. राहुल पवार यांची गरीब परिस्थिती असल्याने आईवडिलांनी कर्ज काढून त्यांचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांच्या उपचार खर्चासाठी अनेक जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांनी आर्थिक मदत केली. मात्र, कोरोनाशी लढताना त्यांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे हे सर्व प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स दरमहा १० हजार ८०० रुपये एवढ्या भत्त्यावर काम करतात. सर्व प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांना कोविड रुग्णसेवेसाठी जुंपण्यात आले आहे. मात्र, त्यांना सुरक्षा कवच म्हणून कुठलाही विमा नाही. गत वर्षाच्या तुलनेत नॉन-कोविड वॉर्ड व लसीकरण केंद्राचा अतिरिक्त भार आहे. त्यांना जोखमीच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजा भत्ता देण्यात येत आहे.
प्रशासनाने आंतरवासिता डॉक्टरांच्या भत्यात वाढ करावी, त्यांना सुरक्षा कवच म्हणून ५० लाखांपर्यंत विमा संरक्षण द्यावे. डॉ. राहुल पवार कुटुंबीयांना न्याय द्यावा या मागण्या करण्यात आल्या. विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष डॉ. सागर पवार, डॉ. संकेत सोनवणे, डॉ. जय शाह, डॉ. प्राजक्ता पाटील डॉ. मेघा आवळे यांच्यासह प्रशिक्षणार्थी डाॅक्टर आंदोलनात सहभागी होते.