डेमू रेल्वेचा जयसिंगपूर रेल्वे स्थानकाजवळ अपघात, केवळ अर्ध्या तासात मदत पथक घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 06:13 PM2023-07-10T18:13:36+5:302023-07-10T18:13:55+5:30
आपत्कालीन मदतीचे प्रात्यक्षिक
मिरज : कोल्हापुरातून-सांगलीला येणाऱ्या डेमू रेल्वेचा जयसिंगपूर रेल्वे स्थानकाजवळ अपघातानंतर आपत्कालीन मदतीचे प्रात्यक्षिक पार पडले. अपघाताच्या सूचनेनंतर केवळ अर्ध्या तासात मदत पथक मिरजेतून घटनास्थळी पोहोचल्याने ही चाचणी यशस्वी ठरली.
जयसिंगपुरात रेल्वे अपघात झाल्याचा संदेश मिरजेत रेल्वे अपघात मदत पथकाला देण्यात आला. अन् काही मिनिटांत मदत पथक मिरज रेल्वे स्थानकातून रवाना झाले. मदत वेळेत पोहोचल्याने मिरजेतील यंत्रणा सक्षम असल्याची खात्री करण्यात आली. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात प्रवासी रेल्वे अथवा मालगाडीचा अपघात झाल्यास मिरजेतून अपघात मदत पथक व वैद्यकीय मदत पथकाची व्हॅन पाठविण्यात येते. ही यंत्रणा कितपत सक्षम आहे, याची चाचणी मध्य रेल्वे पुणे विभागाचे सहायक रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह व विभागीय सुरक्षा आयुक्त देवेंद्र कुमार याच्याकडून घेण्यात आली.
मिरजेतील अपघात मदत पथक व वैद्यकीय मदत पथकाला कोल्हापूरहून सांगलीला येणाऱ्या डेमू रेल्वेचा जयसिंगपूर स्थानकाजवळ अपघात झाल्याचा संदेश रविवारी दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी देण्यात आला. संदेश येताच अपघात मदत पथकाचे सर्व अधिकारी कर्मचारी तातडीने मदत व्हॅनमध्ये दाखल झाले. मदत पथक १७ मिनिटांतच मिरज रेल्वे स्थानकातून १२ वाजून ४० मिनिटांनी जयसिंगपूरला रवाना झाले. वैद्यकीय मदत पथकदेखील स्थानकात आले, मात्र प्रात्यक्षिक असल्याने वैद्यकीय मदत पथक मात्र मिरजेतून रवाना झाले नाही.