डेंग्यू, चिकुनगुनियासदृश साथीमुळे म्हैसाळमध्ये सर्वेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:26 AM2021-05-12T04:26:53+5:302021-05-12T04:26:53+5:30
ओळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथे डेंग्यू व चिकुनगुनियाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले ...
ओळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथे डेंग्यू व चिकुनगुनियाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले आहे.
म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आता डेंग्यू व चिकुनगुनियाच्या साथीने तोंड वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाली. घराेघरी तपासणी करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अनिल खराडे, योगेश पाटील, किरण पाटील, आरोग्य सेवक सुहास डोंगरे यांनी गावातील शेडबाळ रस्ता, बंगला रोड, अंबिकनगर या भागाची पाहणी केली. पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्यांमध्ये त्यांना डेंग्यू व चिकुनगुनियाचे डास आढळून आले. काही पाण्याच्या टाक्यांमध्ये पथकाने म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्रातून गप्पी मासे सोडले. तर काही जणांना पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यांच्या सूचना दिल्या. हे पथक दोन दिवस म्हैसाळमध्ये तपासणी करणार आहे. नागरिकांनी सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार खंदारे, अशोक वडर उपस्थित होते.
चौकट
‘लाेकमत’च्या वृत्ताची दखल
‘लोकमत’ने १० मे रोजी ‘म्हैसाळ येथे डेंग्यू व चिकुनगुनियाची साथ’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीची दखल घेत तत्काळ जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले. तातडीने सर्वेक्षणही सुरू झाले. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त हाेत आहे.
काेट
आम्ही सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आज तपासणी करण्यासाठी हजर झालो आहोत. काही ठिकाणी तपासणी झाली आहे. जेथे डेंग्यू व चिकुनगुनियाचे डास आढळून आले आहेत. तेथे गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. अद्याप इतर ठिकाणची तपासणी करणार आहोत.
- अनिल खराडे
जिल्हा परिषद आरोग्य (हिवताप) विभाग सांगली
चौकट
म्हैसाळमध्ये डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण आढळत आहेत. ज्यांना लक्षणे आहेत त्यांच्या रक्ताची तपासणी करून त्याच्यावर उपचार केले जातील.
डॉ. नंदकुमार खंदारे
- वैद्यकीय अधिकारी
म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्र