बलात्कारप्रकरणी बोलण्यास कुरणे दाम्पत्याचा नकार
By Admin | Published: August 28, 2016 12:18 AM2016-08-28T00:18:42+5:302016-08-28T00:18:42+5:30
पोलिसांकडून पुरावे : साक्षीदारांचा शोध
मिरज : मिरजेत अत्याचार पीडित तरुणीवर बलात्कारप्रकरणी आरोपी कुरणे दाम्पत्याने कानावर हात ठेवले आहेत. अमित कुरणे याने तरुणीवर बलात्कार केल्याची माहिती नसल्याचा पवित्रा पोलिस कोठडीत असलेल्या कुरणे दाम्पत्याने घेतल्याने पोलिसांकडून पुरावे व साक्षीदारांचा शोध सुरू आहे.
मिरजेत बलात्कार पीडित तरुणीवर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केल्याने तिने आत्महत्या केली. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित यास फरारी होण्यासाठी मदत केल्याबद्दल अण्णासाहेब कुरणे व सौ. सुनीता कुरणे या दाम्पत्यास सहआरोपी करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपी अमित कुरणेसह तिघांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. अमित कुरणे याची आई-वडिलांसमोर चौकशी करण्यात येत आहे. अमित कुरणे याने पीडितेस कृष्णा घाटावरील शेतातील घरात व मिरजेतील शिवाजीनगर येथील घरात डांबून ठेवून बलात्कार केल्याची तक्रार आहे. मात्र अमितचे आई-वडील परगावी असल्याने बलात्काराच्या घटनेबाबत काहीही माहिती नसल्याचे पोलिसांना सांगत आहेत. अमित यास फरारी होण्यास मदत केल्याचेही त्यांनी नाकारल्याने, पोलिस अमित याच्या मोबाईलवरील कॉलच्या नोंदीवरून फरारी काळात त्याचा कोणाशी संपर्क होता, याचा तपशील घेत आहेत. बलात्कारप्रकरणी दहाजणांची साक्ष नोंदविली असून, साक्षीदारांचा शोध सुरू आहे. (वार्ताहर)
हार्डडिस्कमधून सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचे प्रयत्न
पीडितेवर खंडणी प्रकरणाशी संबंधित गांधी चौक पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर खंडणीच्या गुन्ह्यात सहभागी पोलिस कर्मचाऱ्यांचा उलगडा होणार आहे. सीसीटीव्हीच्या डिव्हीआरमधील हार्डडिस्कमधून सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचे प्रयत्न अद्याप यशस्वी झालेले नाहीत. अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडून याप्रकरणी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या चौकशीचा अहवाल लवकरच सादर होणार असल्याची माहिती मिळाली.