सांगलीत पसरली दाट धुक्याची चादर, लहरी हवामानामुळे नागरिक हैराण
By अविनाश कोळी | Published: November 28, 2022 12:20 PM2022-11-28T12:20:03+5:302022-11-28T12:20:30+5:30
हवामान बदलामुळे सर्दी, ताप, खोकला व अन्य संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढले
सांगली : ऐन थंडीत तापमानात वाढ होत असतानाच सोमवारी पहाटे सांगली शहरावर धुक्याची चादर पसरली. मागील आठवड्यात पावसानेही हजेरी लावली होती. हवामानाच्या या लहरीपणामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
सांगली शहर व परिसरात सोमवारी पहाटे साडे पाच वाजल्यापासून धुके पडण्यास सुरुवात झाली. सकाळी साडे सातपर्यंत दाट धुके कायम होते. धुक्यांमुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. शालेय विद्यार्थी, फिरायला जाणाऱ्या नागरिकांनाही धुक्यातून वाट काढताना कसरत करावी लागली. थंडी सक्रीय झाल्यापासून प्रथमच सांगली शहरात धुक्याची हजेरी लागली.
गेल्या काही दिवसांत हवामानात बदल होत आहेत. कधी बोचरी थंडी, कधी उकाडा, कधी पाऊस तर कधी धुक्याच्या हजेरीने नागरिक हैराण झाले आहेत. लहरी हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. शहरातील खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये या हवामान बदलामुळे सर्दी, ताप, खोकला व अन्य संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत.
किमान तापमान २२ अंशावर
जिल्ह्याचे सरासरी किमान तापमान सध्या २२ अंश सेल्सिअसवर आहे. गेले काही दिवस २१ ते २२ अंशाच्या घरात तापमान आहे. सरासरीपेक्षा हे तापमान ५ ते ६ अंशाने जास्त असल्याने रात्रीचा उकाडा जाणवत आहे. कमाल तापमान सध्या सरासरीइतके म्हणजेच ३१ अंश सेल्सिअस आहे.
पुढील आठवडा असा असेल
तारीख - किमान - कमाल
२९ नोव्हेंबर - २१ - ३२
३० नोव्हेंबर - २० - ३२
१ डिसेंबर - २० - ३१
२ डिसेंबर - १९ - ३१
३ डिसेंबर - २० - ३१