देवराष्ट्रे वसतिगृह अधीक्षक, चौकीदाराचा राजीनामा
By admin | Published: October 9, 2016 12:29 AM2016-10-09T00:29:35+5:302016-10-09T00:40:44+5:30
संस्थेला आली जाग : बैठकीत कर्मचारी धारेवर--लोकमतचा दणका
देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण संस्थेच्या संचालकांची विठामाता चव्हाण वसतिगृहाच्या गैरव्यवहारासंदर्भातील तातडीची बैठक शनिवारी यशवंतराव हायस्कूलमध्ये पार पडली. यावेळी वसतिगृहाचे अधीक्षक लक्ष्मण दिनकर महिंंद व चौकीदार अंकुश मल्हारी मिसाळ या दोघांनी संस्थेचे अध्यक्ष मोहनराव मोरे व सचिव संजय मोरे यांच्याकडे राजीनामे सादर केले.
देवराष्ट्रेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर अन्न मागून खाण्याची वेळ आली होती. यामुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड झाला होता. ‘लोकमत’ने उजेडात आणलेल्या या कारभाराची दखल घेऊन शुक्रवारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, जिल्हा परिषदेतील पक्षप्रतोद सुरेश मोहिते, उपसभापती सखाराम सूर्यवंशी यांनी तातडीने वसतीगृहास भेट घेऊन चौकशीचे आदेश दिले होते.
त्यामुळे शनिवारी संस्था संचालकांनी तातडीची बैठक घेतली. बैठकीत ढिसाळ कारभाराबाबत कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी संस्थेचे अधीक्षक लक्ष्मण महिंंद तसेच चौकीदार अंकुश मिसाळ यांनी संस्थेच्या अध्यक्षांकडे राजीनामा सादर केला.
संस्थेने वसतिगृहातील तिन्ही कर्मचाऱ्यांना काम सुधारण्याची संधी देऊन तीनवेळा नोटीसही दिली होती. मात्र कर्मचाऱ्यांनी कोणतीही सुधारणा केल्याचे दिसले नाही. हे राजीनामे समाजकल्याण विभागाकडे सादर करून पुढील कारवाई करणार असल्याचे अध्यक्ष मोरे यांनी सांगितले.
यावेळी आत्माराम ठोंबरे, आनंदराव मोरे, राजेंद्र शिंदे, मुख्याध्यापक सतीश बनसोडे उपस्थित होते. (वार्ताहर)
वसतिगृहाच्या साहित्यात गोलमाल
वसतिगृहामध्ये शासनाच्या माध्यमातून तसेच संस्था संचालकांच्या माध्यमातून उपयुक्त वस्तूंची अनेकवेळा खरेदी करण्यात आली आहे. मात्र या संस्थेमध्ये डेडस्टॉक बुकप्रमाणे कोणतेही साहित्य पाहावयास मिळत नाही. बेडशीट, बूट, ताटे, तांब्या, वाट्या, चादरी, फोटो, संगणक संच हे साहित्य आढळून आले नाही. यावरून संस्थेचे सचिव संजय मोरे, आनंदराव मोरे, आत्माराम ठोंबरे यांनी अधीक्षक महिंंद यांना चांगलेच धारेवर धरून संबंधित साहित्य तात्काळ वसतिगृहात जमा करण्यास सांगितले.