देवरुख नगर पंचायतीला सत्ताधाऱ्यांचेच टाळे

By admin | Published: June 25, 2015 11:01 PM2015-06-25T23:01:46+5:302015-06-25T23:01:46+5:30

विविध प्रश्नांवर आक्रमक : प्रशासनाविरूध्द व्यक्त केला संताप

Deorrukh Nagar Panchayat to defeat the power of the people | देवरुख नगर पंचायतीला सत्ताधाऱ्यांचेच टाळे

देवरुख नगर पंचायतीला सत्ताधाऱ्यांचेच टाळे

Next

देवरूख : नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान काराभाराविरोधात आक्रमक होत सत्ताधारी शिवसेनेनेच आज नगरपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रकार केला. मात्र पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर हे टाळे काढण्यात आले.राज्यात आणि केंद्रात सेना-भाजपा युतीचेच सरकार आहे तर स्थानिक आमदार व खासदारही शिवसेनेचे असल्याने नागरिकांचा रोष सहन करण्याची वेळ येथील स्थानिक नगरसेवकांवर येत आहे. पूर्वी नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी व अभियंते नव्हते यामुळे कारभार ढासळला होता तर आता कायमस्वरूपी मुख्याधिकारी असूनही नगरसेवक आणि प्रशासनातील समन्वयाअभावी जनतेची कामे रखडल्याचे चित्र दिसत आहे. यावर गेले अनेक दिवस तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. मात्र याकडे वेळ देण्यास कुणालाच फुरसत नव्हती. सत्तेत असूनही शिवसैनिक याविरोधात होते. मात्र भाजपाकडून याबाबतीत काहीच हालचाली झालेल्या नव्हत्या. यात भरीस भर म्हणून येथील मुख्याधिकारी एक महिन्याच्या वैद्यकीय रजेवर गेल्या आहेत.
जनतेचा रोष आपण स्वीकारण्यापेक्षा खरी चूक कोणाची? हे कळण्यासाठी अखेर या सर्व प्रकारावर हल्लाबोल करण्याचा विचार करून नगरसेवक व माजी सभापती बंड्या बोरुकर, प्रभारी नगराध्यक्ष मनिष सावंत, भारतीय विद्यार्थी सेनेचे छोट्या गवाणकर यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस ठाणे, आमदार यांना निवेदने सादर करीत याची दखल घ्या अन्यथा नगरपंचायतीला टाळे ठोकू, असा इशारा दिला होता.
या इशाऱ्याला २४ तास उलटूनही त्याची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसैनिकांनीच संध्याकाळी ४.३० वाजता नगरपंचायतीला टाळे ठोकले. यावेळी नगरसेवक बंड्या बोरुकर, प्रभारी नगराध्यक्ष मनिष सावंत, छोट्या गवाणकर, संदीप धावडे, संतोष शिंदे, दीपक कुळ्ये, मुबीन पटेल, अजित घडशी, दत्ता गडदे, नागेश चव्हाण, बबन बोदले आदी शिवसैनिक उपस्थित होते. नगरपंचायतीला टाळे ठोकल्यामुळे सर्व कर्मचारी आतमध्येच अडकले. या कर्मचाऱ्यांनीच तत्काळ देवरूख पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून घडल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर पोलीस ठाण्याचे राजेंद्र जाधव आणि प्रमोद वाघाटे यांनी घटनास्थळी येत शिवसैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावर आम्हाला ठोस आश्वासन द्या, अन्यथा टाळे काढणार नाही, असा इशारा देताच संबंधित पोलिसांनी प्रभारी मुख्याधिकारी जावडेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शिवसैनिक आणि त्यांच्यात संवाद घडवून आणला. यावेळी जावडेकर यांनी आपण शुक्रवारी दुपारी १२ वाजता नगरपंचायतीत हजर होऊ आणि त्यानंतर येथे रखडलेल्या सर्व कामांची माहिती घेऊन ती तातडीने पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर सुमारे २० मिनिटानंतर नगरपंचायतीचे टाळे शिवसैनिकांनी काढले. यामुळे उद्या काय होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)े

Web Title: Deorrukh Nagar Panchayat to defeat the power of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.