केंद्र शासनाकडून प्राप्त निधीतील सव्वा कोटींची कामे केली मॅनेज, सांगली महापालिकेत मोठा गैरव्यवहार
By शीतल पाटील | Published: October 7, 2023 04:35 PM2023-10-07T16:35:06+5:302023-10-07T16:44:06+5:30
शहर अभियंत्याची विभागीय चौकशी तर नऊ जणांना निलंबनपूर्व नोटीस
सांगली : शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त निधीतील सव्वा कोटी रुपयांची कामे मॅनेज करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने महापालिका प्रशासन हादरले आहे. या प्रकरणी आयुक्त सुनील पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली असून शहर अभियंत्यांना विभागीय चौकशी का करू नये, अशी नोटीस बजावली आहे. तर नगर अभियंता, शाखा अभियंत्यासह लिपिक अशा नऊ जणांना निलंबनपूर्व नोटीस दिली आहे. येत्या ४८ तासात कारणे दाखवा नोटिशीचा खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र शासनाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एन कॅप)मधील हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेला निधी देण्यात आला आहे. यातील सव्वा कोटी रुपयांची फुटपाथवर पेव्हिंग ब्लाॅक बसविण्याची १३ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. दहा लाखांच्या आतील अंदाजपत्रक तयार करून निविदा मॅनेज करण्यात आल्याचा आक्षेप नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी घेतला होता. त्याची दखल घेत आयुक्तांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. ही सर्व कामे रद्द केली.
आता आयुक्तांनी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, नगर अभियंता परमेश्वर हलकुडे, भगवान पांडव, स्थापत्य अभियंता दीपक पाटील, पर्यावरण अभियंता अजित गुजराथी, प्रभारी शाखा अभियंता महेश मदने यांच्यासह चारही प्रभाग समितीकडील निविदा प्रक्रिया पाहणाऱ्या लिपिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या ४८ तासात नोटिशीवर खुलासा करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्त पवार यांनी दिला आहे.