Lok Sabha Election 2019 निवडणूक मैदानात ४९ टक्के उमेदवारांचे होते डिपॉझिट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:24 PM2019-04-11T23:24:36+5:302019-04-11T23:24:56+5:30
अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगलीच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात आजवर डिपॉझिट जप्त होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण हे ...
अविनाश कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगलीच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात आजवर डिपॉझिट जप्त होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण हे सरासरी ४९ टक्के इतके राहिले आहे. एकूण १६ निवडणुकांमध्ये चार निवडणुकांत केवळ दोनच उमेदवार रिंगणात राहिल्याने कोणाचेही डिपॉझिट जप्त झाले नव्हते. उर्वरित १२ निवडणुकांमध्ये अनेक उमेदवारांना अनामत वाचविता आली नाही.
लोकसभेच्या इतिहासात १९५७, १९७७, १९८0, १९८४ याच चार निवडणुकांत दोनच उमेदवार रिंगणात होते. अशावेळी कोणाचीही अनामत जप्त झाली नाही. मात्र १९७१ मध्ये झालेल्या निवडणुकीत ६ उमेदवार रिंगणात असताना, विजेता वगळता अन्य पाचही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. काँग्रेसचे गणपती तुकाराम गोटखिंडे यांनी एकूण मतांच्या ७८.११ टक्के मते मिळवित एकतर्फी विजय मिळविला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार भगवानराव सूर्यवंशी यांना १0.७७ टक्के मते मिळाली होती. उर्वरित पंधरा निवडणुकांमध्ये कधीही असे चित्र दिसले नाही. विजयी व त्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवारालाच अनामत वाचविता आली. २0१४, २00९ आणि १९९१ मध्ये ८५ टक्क्यांहून अधिक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. यंदाच्या निवडणुकीतही डझनभर उमेदवार रिंगणात आहेत. अशावेळी कितीजणांचे डिपॉझिट जप्त होणार, हा चर्चेचा विषय आहे. सध्या २५ हजार रुपये डिपॉझिट ठेवण्यात आले आहे. टप्प्या-टप्प्याने अनामत रकमांमध्ये वाढ होत आहे.
वर्ष एकूण डिपॉझिट टक्के
उमेदवार जप्त झालेले
४१९५२ : ४ २ ५0
४१९५७ : २ 0 0
४१९६२ : ४ २ ५0
४१९६७ : ४ २ ५0
४१९७१ : ६ ५ ७१
४१९७७ : २ 0 0
४१९८० : २ 0 0
४१९८४ : २ 0 0
४१९८९ : ५ ३ ६0
४१९९१ : ८ ६ ७५
४१९९६ : १८ १५ ८८
४१९९८ : ४ २ ५0
४१९९९ : ४ २ ५0
४२००४ : ८ ५ ७१
४२००९ : १४ १२ ८६
४२०१४ : १७ १५ ८८
डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून आवश्यक मते
आजही अनेकांना नेमके डिपॉझिट वाचविण्यासाठी किती मते लागतात, हे माहीत नाही. एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मते मिळाली नाहीत, तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होत असते.