मोबाईल ॲपव्दारे कर्ज घेऊन वाढतोय मन:स्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:21 AM2020-12-26T04:21:43+5:302020-12-26T04:21:43+5:30
सांगली : मोबाईल ॲपच्या माध्यमातून झटपट कर्ज देणाऱ्यांकडून सावध राहण्याच्या सूचना शासनातर्फे देण्यात आल्या असल्या तरी या माध्यमातून कर्ज ...
सांगली : मोबाईल ॲपच्या माध्यमातून झटपट कर्ज देणाऱ्यांकडून सावध राहण्याच्या सूचना शासनातर्फे देण्यात आल्या असल्या तरी या माध्यमातून कर्ज घेतलेल्यांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. आतापर्यंत केवळ उदाहरणे ऐकली असली तरी आता सांगलीतही असा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांनी पोलिसात संपर्क साधून तक्रारही दाखल केली आहे.
लॉकडाऊन कालावधित सर्वजण घरातच अडकून पडल्याने अनेकांना आर्थिक चणचण भासू लागली होती. उत्पन्नाची साधनेही नसल्याने अडचणी वाढल्या होत्या. नेमकी हीच संधी साधून केवळ मोबाईल ॲपवर माहिती भरल्यास पाच हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंतची कर्जे देण्यात येत आहेत. या कंपन्यांचे ॲप मोबाईलमध्ये घेतल्यानंतर त्या व्यक्तीचे संपर्क क्रमांकासह सर्व माहिती त्या कंपनीकडे जाते. तात्काळ सेवा देताना कर्जाची रक्कम पाठविलीही जाते; मात्र त्यानंतर खरा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. पैसे परत करण्यास उशीर झाल्यास थेट कर्जदाराच्या नावाने व्हॉटस्-ॲप बदनामीकारक संदेश त्याच्या संपर्क यादीतील लोकांना पाठविले जात आहेत. तरीही पैसे न दिल्यास त्या व्यक्तीच्या माहितीचा, फोटोसह इतर माहितीचाही गैरवापर करून वारंवार त्यास मन:स्ताप दिला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत हा प्रकार इतर ठिकाणी चर्चेत होता. आता सांगलीतही कर्जदारास त्रास दिला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातील काहींनी पोलिसांशी संपर्क साधून आपली तक्रार दाखल केली आहे.
चाैकट
इन्स्टंट कर्ज देणाऱ्या या कंपन्यांचे ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करताच त्या मोबाईलधारकांची सर्व माहिती लीक होते. त्यामुळे पुढे एखादाजरी हप्ता भरण्यास उशीर झाला तर थेट त्याच्या संपर्क यादीतील लोकांना मेसेज करून आणि काॅल करूनही त्रास दिला जातो. त्यामुळे अशी ॲप मोबाईलमध्ये घेऊ नयेत, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.