जागतिक वारसा स्थळाबाबत उदासीनता

By admin | Published: April 17, 2017 11:23 PM2017-04-17T23:23:53+5:302017-04-17T23:23:53+5:30

जागतिक वारसा स्थळाबाबत उदासीनता

Depression on World Heritage Site | जागतिक वारसा स्थळाबाबत उदासीनता

जागतिक वारसा स्थळाबाबत उदासीनता

Next


सांगली : जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्यानंतरही गेल्या पाच वर्षांत चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होऊ शकले नाही. या स्थळांचा वारसा जपणारी प्रशासकीय यंत्रणाच याबाबत उदासीन दिसत आहेत. चांदोलीबरोबरच कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या गिरिलिंग पर्वतावरील बौद्ध, हिंदू व जैन लेणीही संशोधनानंतरही दुर्लक्षित राहिली.
युनेस्कोच्या १ जुलै २०१२ रोजीच्या जागतिक वारसा यादीत पश्चिम घाट आणि त्यातील ३९ स्थळांचा समावेश झाला. यामध्ये जिल्ह्याच्या चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. शिराळा तालुक्यात वारणा नदीवर चांदोली धरण आहे. त्याच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य आहे. २००४ मध्ये यास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला होता. इतक्या वर्षात पर्यटनाच्या दृष्टीने चांदोली उद्यानाचा कोणताही विकास झाला नाही.
जैवविविधतेच्या बाबतीत अनेक राष्ट्रीय उद्यानांपेक्षा चांदोली सरस आहे. त्यामुळे पर्यटनाला याठिकाणी मोठा वाव आहे. येथील पर्यटन विकासावर जिल्ह्याचाही विकास अवलंबून आहे. निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, आॅनलाईन बुकिंग सेवा, गाईड तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या जाहिराती अशा विविध प्रयत्नांमधून पर्यटन विकास करता येतो. मात्र, गेल्या पाच वर्षांत कोणत्याही सुविधा याठिकाणी उपलब्ध झाल्या नाहीत. परिणामी जिल्ह्यातील लोकांमध्येही या उद्यानाबद्दलची उत्सुकता कमी दिसून येते. चांदोलीबाबत राज्याच्या पर्यटन विकास महामंडळालाही रस नसल्याचेच चित्र आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावरही चांदोलीचा ठळक उल्लेख नाही. (प्रतिनिधी)
दंडोबा, गिरिलिंगची व्यथा
ब्रिटिशकाळात काही ब्रिटिश अधिकारी उन्हाळ््यात दंडोबा डोंगरावर येऊन रहात असत. १८३० पासूनचे याबाबतचे कागदी पुरावेही उपलब्ध आहेत. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी याठिकाणी सूर्योदय आणि सूर्यास्ताचे (सनराईज, सनसेट) पॉर्इंटही शोधले आहेत. आकाशातील नक्षत्र निरीक्षणाचे सर्वात सुंदर आणि योग्य केंद्र म्हणून दंडोबा डोंगराकडे पाहिले जाते. गिरिलिंग डोंगरावर दीड वर्षापूर्वी मिरज इतिहास संशोधन मंडळाने सहा लेणी शोधली. बौद्ध, जैन आणि शैव लेण्यांचा हा समूह आजवर सामान्यांच्या नजरेपासून दूर होता. हे दोन्ही डोंगर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होऊ शकतात.

Web Title: Depression on World Heritage Site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.