उपमहापौरांनी पळविला ६० लाखांचा निधी

By admin | Published: June 9, 2016 11:39 PM2016-06-09T23:39:20+5:302016-06-10T00:17:26+5:30

स्थायी समितीत आरोप : सभा तहकूब; बांधकामाच्या फायली परत मागविल्या

Deputy Demand Draft Rs 60 Lakh Fund | उपमहापौरांनी पळविला ६० लाखांचा निधी

उपमहापौरांनी पळविला ६० लाखांचा निधी

Next

सांगली : महापालिकेचे अंदाजपत्रक नगरसेवकांच्या हाती येण्यापूर्वीच सुमारे साडेसहा कोटींचा निधी खर्ची टाकण्यात आला आहे. यात उपमहापौर विजय घाडगे यांनी तब्बल साठ लाखांच्या निधीवर डल्ला मारल्याचा आरोप गुरुवारी स्थायी समिती सभेत करण्यात आला. निधी वाटपावरून सभेत गदारोळ झाल्याने सभा तहकूब करण्यात आली. सभापती संतोष पाटील यांनी बांधकाम विभागाने सर्व फायली स्थायी समितीकडे सादर करण्याचे आदेश दिले.
महापालिकेची स्थायी समिती सभा सभापती संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत नगरसेवक शिवाजी दुर्वे यांनी थेट उपमहापौर घाडगे यांच्यावरच हल्ला चढविला. तत्पूर्वी नगरसेवक दिलीप पाटील यांनी अंदाजपत्रक हाती येण्यापूर्वीच निधी खर्ची कसा पडला? असा सवाल करीत शहर अभियंत्यांना धारेवर धरले. अंदाजपत्रकात विकास निधीपोटी २ कोटी ९० लाख व गुंठेवारीसाठी चार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सहा कोटींपैकी सध्या केवळ १५ लाख रुपये शिल्लक आहेत. पदाधिकारी व ज्येष्ठ नगरसेवकांनी निधी खर्ची टाकला आहे. यावरून सभेत बराच गदारोळ झाला.
शिवाजी दुर्वे यांनी गुंठेवारीचा निधी कुठे गेला, असा सवाल करीत एकट्या उपमहापौरांनी ६० लाखांच्या निधीवर डल्ला मारला आहे. एकीकडे स्थायी समिती सदस्य निधी पळवित असल्याचा आरोप ते करतात, मग स्वत: त्यांनी काय केले? असा सवालही केला. सभापती संतोष पाटील यांनी प्रत्येक सदस्यांनी पाठपुरावा करून आपल्या फायली तयार केल्या आहेत. त्यातील कामे थांबवू नये. अत्यावश्यक कामे सोडून इतर कामाच्या फायली स्थायी समितीसमोर हजर कराव्यात. त्यावर सर्वसमावेशक चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही सदस्यांना दिली. पण पाटील यांच्या आश्वासनालाही सदस्यांनी विरोध करीत बांधकाम विभागाकडून फायली येत नाहीत, तोपर्यंत सभा तहकूब करण्याची मागणी केली. अखेर सभापतींनी बुधवारपर्यंत फायली स्थायी समितीकडे सादर कराव्यात, असे आदेश उपायुक्त व शहर अभियंत्यांना दिले. ड्रेनेज योजनेचे काम बंद असल्याबद्दल दुर्वे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारला.
ड्रेनेज योजनेतील मिरजेचा निधी शासनाकडून आल्याशिवाय कामे सुरू होणार नाहीत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यावर दुर्वे यांनी, गणेशनगरला कसे काम सुरू आहे, असा उलट प्रश्न केला. माझ्या प्रभागातही कामे अत्यावश्यक आहेत. तेथील रस्ते डांबरी करायचे आहेत, ही कामेही सुरू करावीत, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)े

५० स्वच्छता कर्मचारी घेणार
महापालिका क्षेत्रात कचरा उठाव, स्वच्छतेच्या कामात दिरंगाई होत आहे. नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस पडत आहे. याबाबत स्थायी सभेत नगरसेविका आशा शिंदे व निर्मला जगदाळे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर सभापती पाटील म्हणाले की, गत सभेत ५० स्वच्छता कर्मचारी मानधनावर घेण्यावर चर्चा झाली आहे. कंत्राटी पद्धतीने केवळ पावसाळ्यातील चार महिन्यांसाठी स्वच्छता कर्मचारी घेण्याचा ठराव मागील सभेच्या इतिवृत्तात करून तात्काळ कर्मचारी घेतले जातील. हे कर्मचारी केवळ स्वच्छतेसाठीच असतील.

Web Title: Deputy Demand Draft Rs 60 Lakh Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.