विश्रामबागमधील आरक्षण उठविण्यास उपमहापौरांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:43 AM2020-12-15T04:43:14+5:302020-12-15T04:43:14+5:30

सांगली : विश्रामबाग येथील कोट्य‌वधी रुपयांच्या मोकळ्या भूखंडावरील आरक्षण उठविण्याचा घाट घातला आहे. याला उपमहापौर आनंदा देवमाने यांनी विरोध ...

Deputy mayor opposes lifting reservation in Vishrambag | विश्रामबागमधील आरक्षण उठविण्यास उपमहापौरांचा विरोध

विश्रामबागमधील आरक्षण उठविण्यास उपमहापौरांचा विरोध

Next

सांगली : विश्रामबाग येथील कोट्य‌वधी रुपयांच्या मोकळ्या भूखंडावरील आरक्षण उठविण्याचा घाट घातला आहे. याला उपमहापौर आनंदा देवमाने यांनी विरोध केला असून त्यासंदर्भात आयुक्तांनाही पत्र पाठविले आहे. प्रशासनाने आरक्षण रद्दचा प्रयत्न केल्यास नगरविकास मंत्रालयाकडे तक्रार करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

विश्रामबाग येथील ७५ गुंठे जागेवर प्ले ग्राऊंडचे आरक्षण होते. ते उठविण्याचाही घाट घातला आहे. दोन वर्षांपूर्वीच यासंदर्भात विषयपत्र तयार झाले होते. परंतु ते आजपर्यंत महासभेसमोर आले नाही. तेथे अद्याप कोणत्याही प्रकारे नागरी वस्ती नाही. तरीही ते आरक्षण उठवून भूखंडाचा बाजार करण्याचे मनसुबे रचले आहेत. हा प्रस्ताव मात्र महासभेसमोर आताही आणला नाही. त्याऐवजी ९० दिवसांपेक्षा अधिक काळ विषयपत्र प्रलंबित राहिले, तर आयुक्तांना यासंदर्भात निर्णयाचे अधिकार, अशी भूमिका घेतली आहे. त्याचा आधार घेत हरकती, सूचना मागविण्यासाठी महापालिकेच्या काचपेटीत ते विषयपत्र लावले आहे.

याबाबत देवमाने म्हणाले, अशा पद्धतीने मोकळ्या भूखंडावरील आरक्षण उठविणे चुकीचे आहे. काचपेटीत विषयपत्र लावल्याने ते फारसे कुणाला माहीत होत नाही. याबाबत आयुक्तांना पत्र पाठविले असून कोणत्याही स्थितीत हे आरक्षण उठता कामा नये. अन्यथा नगरविकास मंत्रालयाकडे प्रशासनाविरोधात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

सर्वपक्षीयांचे आज आंदोलन

दरम्यान, कुपवाड, विश्रामबाग येथील आरक्षण उठविण्याविरोधात मंगळवारी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन होणार असून त्यात सर्वपक्षीय नगरसेवकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन निमंत्रक सतीश साखळकर यांनी केले आहे.

Web Title: Deputy mayor opposes lifting reservation in Vishrambag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.