Sangli: सुवर्ण कारागिराची फसवणूक प्रकरणात कर्तव्यात कसुरी; जतचे तीन पोलिस निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:53 PM2023-11-10T12:53:32+5:302023-11-10T12:53:40+5:30
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केली कारवाई
जत : कमी दरात सोने देण्याच्या बहाण्याने सुवर्ण कारागिराची २६ लाख ५० हजारांची फसवणूक प्रकरणातील तपासात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी ही कारवाई केली आहे. जत पोलिस ठाण्याकडील पोलिस शिपाई समीर जबरदस्त मुल्ला, विजय मच्छिंद्र नरळे व पोलिस हवालदार महादेव तुळशीराम धुमाळ अशी निलंबन झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आंध्र प्रदेश राज्यातील कारागिरास जत तालुक्यातील पाचजणांनी सोने कमी दरात देतो म्हणून जत येथे बोलावून घेतले होते. संबंधित कारागिराला सोने न देता त्याच्याकडील साडेसव्वीस लाखांची रोकड असलेली बॅग पळवून नेण्यात आली होती. या घटनेदरम्यान पोलिस कर्मचारी समीर मुल्ला व अन्य एक पोलिस घटनास्थळी असल्याची तक्रार फिर्यादीने केली होती; पण, गुन्हा दाखल करताना त्यांची नावे वगळण्यात आल्याने पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर जतचे पोलिस निरीक्षक राजेश रामागरे यांनी वरील तिघा पोलिसांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांच्याकडे पाठविला होता. त्यावर पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी तत्काळ तिघांच्या निलंबनाचे आदेश दिले.
माजी आमदार विलासराव जगताप यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करत पोलिसांना का वाचवण्यात येत आहे, अशी विचारणा केली होती.
आणखी दोघांना अटक
दरम्यान, या प्रकरणातील रमेश कोळी व अमोल कुलकर्णी यांना रविवारी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. मुख्य संशयित आरोपी मेहबूब जातगार, दऱ्याप्पा हवीनाळ मिस्त्री यांना गुरुवारी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता चौघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.