Lok Sabha Election 2019 लोकसभेच्या प्रचाराची जिल्ह्यात सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:54 PM2019-04-21T23:54:58+5:302019-04-21T23:55:15+5:30

सांगली : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, सभा, बैठका, पदयात्रा-भेटीगाठींचे कार्यक्रम, ध्वनिक्षेपकावरून तसेच डिजिटल पडद्यावरील चित्रफितींमधून घुमणारे आवाज रविवारी सायंकाळी सहानंतर शांत ...

Describing the campaign for the Lok Sabha in the district | Lok Sabha Election 2019 लोकसभेच्या प्रचाराची जिल्ह्यात सांगता

Lok Sabha Election 2019 लोकसभेच्या प्रचाराची जिल्ह्यात सांगता

Next

सांगली : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, सभा, बैठका, पदयात्रा-भेटीगाठींचे कार्यक्रम, ध्वनिक्षेपकावरून तसेच डिजिटल पडद्यावरील चित्रफितींमधून घुमणारे आवाज रविवारी सायंकाळी सहानंतर शांत झाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर, आता मतदारराजाचा कौल कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी, २३ एप्रिलला सांगली, हातकणंगले मतदारसंघासाठी मतदान होत असून प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे.
रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सांगलीत दिग्गजांच्या प्रचारतोफा धडधडल्या. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगलीत आणि नितीन गडकरी यांची विट्यात सभा झाली, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगलीतील सभेने काँग्रेस महाआघाडीच्या प्रचाराची सांगता केली. वंचित बहुजन आघाडीने जिल्हाभरात पदयात्रा काढल्या.
सांगली, हातकणंगले लोकसभा मतदारसंघांची निवडणूक यंदा राज्यात लक्षवेधी ठरल्याने अनेक दिग्गज नेत्यांनी सभा घेऊन प्रचाराचा धुरळा उडविला. सांगलीत भाजपतर्फे खासदार संजयकाका पाटील, काँग्रेस महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे विशाल पाटील, तर वंचित बहुजन आघाडीतर्फे गोपीचंद पडळकर यांच्यात चुरस असून, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यात जोरदार लढत होत आहे.
वसंतदादा पाटील यांचे नातू म्हणून विशाल पाटील यांच्या ताकदीची, तसेच राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेची, जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपच्या नेत्यांची व खासदार संजयकाका पाटील यांच्या अस्तित्वाची, तर शेतकऱ्यांचे नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाची परीक्षा घेणारी ही निवडणूक मानली जात आहे. तुल्यबळ उमेदवारांमुळे या दोन्ही मतदारसंघात जोरदार चुरस दिसत आहे. त्यामुळे प्रचाराची सांगता झाल्यानंतर, आता मतांचा कौल कोणाला, टक्केवारी वाढणार की कमी होणार, त्याचा लाभ कोणाला होणार, अशा चर्चांना उधाण आले आहे.
प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून, सोमवारी नियुक्त अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांचा ताबा घेणार आहेत. जिल्ह्यात एकूण २३ लाख ६३ हजार १२८ मतदार असून, सांगली मतदारसंघात १८ लाख ३ हजार मतदान आहे.
सांगली मतदारसंघात ९ लाख २३ हजार २३२ पुरुष, तर ८ लाख ७३ हजार ७४९ स्त्री मतदार आहेत. हातकणंगले मतदार संघातील वाळवा, शिराळा विधानसभा मतदारसंघांमध्ये ५ लाख ६0 हजार 0७४ मतदारसंख्या आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात २ लाख ६९ हजार २९५, तर शिराळा विधानसभा मतदारसंघात २ लाख ९0 हजार ७७९ इतके मतदार आहेत.

आज सर्व साहित्याचे वितरण होणार
मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलिंग पार्टीला सोमवारी ईव्हीएम बॅलेटसह सर्व साहित्याचे वितरण केले जाईल. विधानसभानिहाय करण्यात आलेल्या स्ट्राँग रुम परिसरात साहित्याचे वितरण दिवसभर चालेल. सर्व पोलिंग पार्टी सायंकाळपर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचतील, मतदानाची व्यवस्था करतील आणि तसा अहवाल सादर करतील.
उद्या सकाळी सहा वाजता ‘मॉक पोल’
मतदान केंद्रावर सकाळी सहा वाजता ‘मॉक पोल’ घेण्यात येईल. यात सर्व उमेदवार व नोटांसह ५० मते टाकण्यात येतील. हे ‘मॉक’ पोलिंग एजंटच्या उपस्थितीत होईल. यासाठी पोलिंग एजंटला कुठल्याही परिस्थितीत सकाळी सव्वासहापर्यंत मतदान केंद्रात पोहोचावे लागेल. ते न आल्यास ‘मॉक पोल’ सुरूकेले जाईल. ते सातपर्यंत चालेल. सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात होईल.

Web Title: Describing the campaign for the Lok Sabha in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.