वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना झिडकारा : देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:14 PM2018-07-15T23:14:52+5:302018-07-15T23:15:45+5:30
सांगली : वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महापालिकेची निवडणूक लढवित आहे. हा त्यांचा अपमान असून, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी सांगलीत केले.
महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ येथील गणपती मंदिरासमोर झाला. यावेळी आयोजित सभेत पालकमंत्री देशमुख बोलत होते. खा. संजयकाका पाटील, खा. अमर साबळे, आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हळवणकर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, सांगली जिल्ह्याला वसंतदादांचा वारसा आहे. दादांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या नावाच्या संस्था नेस्तनाबूत झाल्या. त्यांना किती वेदना झाल्या असतील. या संस्था बुडविणाºयांना सांगलीच्या जनतेने धडा शिकविण्याची वेळ आली आहे. ज्यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महापालिकेची निवडणूक लढवित आहे. सत्ता बळकाविण्यासाठी एकत्र आलेल्यांना जनता घरात बसविल्याशिवाय राहणार नाही.
देश व राज्य जनतेने काँग्रेसमुक्त केले आहे. सांगली जिल्हा परिषदेतही सत्तापरिवर्तन केले. आता काँग्रेसची ही शेवटची सत्ता आहे. जनतेने महापालिकासुद्धा काँग्रेसमुक्त करावी, असे आवाहन करीत देशमुख म्हणाले की, देशात, राज्यात परिवर्तन झाल्यानंतर भाजपने जनतेच्या हितासाठी अनेक योजना हाती घेतल्या. मुद्रा योजना, मोफत गॅस कनेक्शन अशा योजनांतून जनतेपर्यंत सुविधा पोहोचविल्या. मराठा समजातील तरुणांना आरक्षणांतर्गत नोकरीचा मुद्दा न्यायालयात प्रभावीपणे मांडला जात आहे. या तरुणांना उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठा निधी दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
सुरेश हळवणकर म्हणाले की, महापालिकेत काँग्रेसची २० वर्षे सत्ता आहे. पण नागरिकांना पाणी, रस्ते, गटारी आदी सुविधाही दिलेल्या नाहीत. दोन कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेरीनाल्याने कृष्णा नदी प्रदूषित होत आहे. हा प्रश्नही सत्ताधाºयांना सोडविता आलेला नाही. भाजप सत्तेवर आल्यानंतर शेरीनाल्यासाठी १३ कोटींचा निधी आणून नदीचे प्रदूषण थांबविले जाईल. सांगलीचा विकास केवळ भाजपच करू शकतो. जनतेच्या कल्याणासाठी गणरायाच्या साक्षीने जो जाहीरनामा तयार होईल, त्याची अंमलबजावणी भाजप करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
खासदार संजयकाका म्हणाले, अनेक वर्षे भ्रष्टाचाराने बरबटलेल्या काँग्रेसच्या कारभाराने जनता त्रासली आहे. काँग्रेस कारभारामुळे या शहराचा विकास थांबला. मिरजेच्या पाणी योजनेचा समावेश अमृत योजनेत केला असतानाही न्यायालयात जाऊन याला खीळ घालण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप केला.
भाजप नेत्यांकडून : जयंत पाटील टार्गेट
भाजपच्या प्रचार प्रारंभावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, आ. सुरेश हळवणकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष्य केले. हळवणकर यांनी, वसंतदादांचे नाव नातू घेत नाही, मात्र जयंत पाटील यांनी या निवडणुकीत वसंतदादांचे नाव घ्यावे लागल्याचा टोला लगाविला. तर सुभाष देशमुख यांनी ‘खंजिर’चा विषय चर्चेत आणत भाजपच्या प्रचाराची दिशाच स्पष्ट केली.
भर पावसात शपथ
भाजपने सर्व उमेदवार डोक्याला फेटा, खांद्यावर भाजपचा पट्टा अशा वेशभूषेत उभे होते. भर पावसात प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी सर्व उमेदवारांना पारदर्शी, गतिमान, विकासाभिमुख, भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ दिली.