शिराळा बाजार समितीमध्ये देशमुख-नाईकांची युती निश्चित
By admin | Published: June 26, 2015 11:03 PM2015-06-26T23:03:40+5:302015-06-27T00:15:34+5:30
लवकरच घोषणा : दोन भाऊंच्यामध्ये प्राथमिक चर्चा पूर्ण
सागाव : शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी कॉँग्रेसचे आ. शिवाजीराव देशमुख व राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक गटाची युती निश्चित असल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या आ. शिवाजीराव नाईक गटानेदेखील या निवडणुकीत अर्ज दाखल केले आहेत. यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत आ. देशमुख व माजी आमदार नाईक गट एकत्रित आले होते. त्यावेळी शिवाजीराव नाईक गट एकाकी पडल्याने माघार घेतली होती. यावेळी माजी आमदार नाईक गटाला ११ जागा व उपसभापतीपद, तर देशमुख गटाला ८ जागा व सभापतीपद असा फॉर्म्युला होता. त्यानुसार त्यांनी बाजार समितीत काम केले. यावर्षीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून यावेळी तिन्ही गटाकडून अर्ज दाखल केले आहेत. जरी देशमुख व माजी आमदार नाईक गटांनी आपले अर्ज भरले असले तरी, या निवडणुकीत दोन्ही गटांची युती निश्चित आहे. याबाबत सत्यजित देशमुख व मानसिंगराव नाईक यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे. अर्ज मागे घेण्याच्या अगोदर या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. यावर्षीही गत निवडणुकीप्रमाणेच जागांचा फॉर्म्युला होणार, हे निश्चित आहे. या दोन्ही गटांची युती निश्चित धरूनच आ. नाईक गटाने अर्ज दाखल केले आहेत. जागा वाटपात काही तरी पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आ. नाईक गट असणार आहे. तसेच गतवेळेप्रमाणे याहीवेळी शिवाजीराव नाईक गटाला बाजार समितीतून बाहेर ठेवायचे, असा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न असणार आहे. नेमके काय होणार, हे १४ रोजी अर्ज माघारीच्या वेळीच स्पष्ट होईल. (वार्ताहर)
शिवाजीराव नाईक गटाला दूर ठेवण्याचा प्रयत्न
गत निवडणुकीप्रमाणेच जागांचा फॉर्म्युला होणार, हे निश्चित आहे. या दोन्ही गटांची युती निश्चित धरूनच आ. नाईक गटाने अर्ज दाखल केले आहेत. जागा वाटपात काही तरी पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आ. नाईक गट असणार आहे. तसेच गतवेळेप्रमाणे याहीवेळी शिवाजीराव नाईक गटाला बाजार समितीतून बाहेर ठेवायचे, असा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न असणार आहे.