लातूरचा देशमुख वाडा काँग्रेससोबतच राहणार: अमित देशमुख, भाजप प्रवेशाची ऑफर धुडकावली
By शीतल पाटील | Published: January 13, 2023 03:21 PM2023-01-13T15:21:33+5:302023-01-13T15:22:42+5:30
आमदार अमित देशमुख यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पडदा टाकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा: सद्याच्या पाच वर्षातील हे तिसरे सरकार आहे. पहिले अडीच दिवसाचे, दुसरे अडीच वर्षाचे आणि सध्याचे तिसरे सरकार आहे. पण चौथे कधी येईल, काही सांगता येत नाही. कितीही संकटं आणि वादळं आली तरी लातूरचा देशमुखवाडा आहे तिथेच राहणार आहे, असे स्पष्ट करीत आमदार अमित देशमुख यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पडदा टाकला.
विटा येथे गुरुवारी सायंकाळी सेंद्रीय शेतीचे अभ्यासक जयंत बर्वे यांचा कृतज्ञता सोहळा आणि नेचर केअर फर्टिलायझर्स कंपनीच्या रौप्यमहोत्सवी वर्ष व पुरस्कार वितरण सोहळ्यात आ. देशमुख बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील यांनी भाजप प्रवेशाची दिलेली ऑफर त्यांनी थेट धुडकावून लावली. उलट तुम्हीच आमच्या घरी (काँग्रेस) परत या, असा सल्ला दिला. या कार्यक्रमास आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, जयदेव बर्वे, कामाक्षी बर्वे उपस्थित होते.
खासदार संजय पाटील म्हणाले, तुम्ही सांगली जिल्ह्यात आला आहात. या जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी विशेष जिव्हाळा राहिला आहे. बर्वे यांच्या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित आहात. त्यांच्या बर्वे वाड्यात गेली ३० वर्षे संघाची शाखा चालते. तुमचे घराणे काँग्रेसचे व मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे या घरच्या कार्यक्रमात तुम्हाला भाजपमध्ये या, असे जाहीर निमंत्रण दिले.
त्यावेळी आमदार देशमुख यांनी ही ऑफर धुडकावत कितीही संकटे आणि वादळे आली तरी लातूरचा देशमुखवाडा आहे तिथेच राहणार आहे. ही संस्काराची श्रीमंती विलासराव देशमुख यांनी आम्हाला दिली आहे. त्यामुळे तुम्हीच स्वगृही यावे आणि त्याची सुरुवात विट्याच्या बर्वे वाड्यातून व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शांतता कोर्ट सुरू आहे
आ. देशमुख यांनी खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्याकडे पाहत आताचे जे सरकार आले आहे, त्या सरकारचे तुम्ही काय नाव ठेवले आहे ? असा प्रश्न केला. त्यावर आमदार बाबर यांनी भाजप-सेना असे उत्तर दिले. त्यावर लगेच आ. देशमुख यांनी शिवसेना शिंदे गट – भाजप असे आता तरी म्हणावे लागेल. कारण मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी शेवटी हे सगळे सर्वोच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे शांतता राखा कोर्ट सुरू आहे, असा टोलाही आमदार देशमुख यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"