देशमुखांचा ‘वालचंद’शी संबंधच काय? : दीपक शिंदे

By admin | Published: June 26, 2016 01:01 AM2016-06-26T01:01:36+5:302016-06-26T01:01:36+5:30

सारेच कायदेशीर होते तर दडपशाही कशाला?

Deshmukh's relationship with Walchand? : Deepak Shinde | देशमुखांचा ‘वालचंद’शी संबंधच काय? : दीपक शिंदे

देशमुखांचा ‘वालचंद’शी संबंधच काय? : दीपक शिंदे

Next

सांगली : साऱ्याच गोष्टी श्रीराम कानिटकरांनी कायदेशीरपणे केल्या असत्या, तर त्यांना दडपशाहीचा वापर करावा लागला नसता. पाच वर्षांत घाईगडबडीने त्यांनी पृथ्वीराज देशमुख यांना जवळ केले. वास्तविक देशमुख यांचा महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन (एमटीई) सोसायटीशी काहीही संबंध नाही, असे मत भाजपचे नेते दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले की, आम्ही या संस्थेत शिकलो. या संस्थेबद्दल आम्हाला आस्था आहे. त्यामुळेच ज्या बेकायदेशीर गोष्टी सुरू आहेत, त्यांना आम्ही उघडपणे विरोध करीत आहोत. अजित गुलाबचंद यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही. ते मला ओळखतही नाहीत. त्यामुळे कोणाच्या सल्ल्याने मी संघर्ष करीत नाही. एमटीईचे सचिव श्रीराम कानिटकरांनी बेकायदेशीररीत्या विशेष सभा बोलावून अध्यक्ष निवडीसह नियामक मंडळच बरखास्त करण्याचा ठराव केला होता. त्यापूर्वीच आम्ही यासंदर्भातील तक्रार धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. आमचे नियामक मंडळ कायदेशीर असल्यामुळे शासन अनुदान रीतसर मिळत होते. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत होते. बेकायदेशीर गोष्टी असत्या, तर शासनाने कधीच कारवाई केली असती.
एमटीई सोसायटीने तयार केलेली घटना दुरुस्ती शासनाने मान्य केली आहे. त्यानंतर स्वायत्तता मिळाल्यानंतर शासनाने कंट्रोल बोर्डाच्या स्थापनेचे परिपत्रक काढले होते. मात्र, संस्थेच्या नियामक मंडळाचे स्वरूप परिपत्रकाप्रमाणेच होते. केवळ नावाचा बदल होता. तरीही शासनाने नावाबाबत कोणताही आग्रह धरलेला नव्हता. त्यामुळे आमचे नियामक मंडळच कायम राहिले. त्यानंतरही शासनाने अनुदान व अन्य गोष्टी महाविद्यालयाला दिल्या.
एमटीईच्या दुसऱ्या गटाचे अध्यक्ष विजय पुसाळकर म्हणाले की, या सोसायटीचा मीच अधिकृत अध्यक्ष आहे. कानिटकरांनी बेकायदेशीररीत्या सभा घेऊन नवे मंडळ स्थापन्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर ५ आॅगस्ट २0११ रोजी चार ते पाच मोठ्या वाहनांमधून देशमुख यांचे लोक पुण्यात आले आणि त्यांनी जबरदस्तीने कार्यालयाचा ताबा घेतला. तेथील सर्व कागदपत्रे त्यांनी सांगलीला स्थलांतरित केली. संस्थेच्या खात्यावर जमा असलेल्या साडेसात कोटी रुपयांपैकी सहा कोटी रुपये त्यांनी बँकेत खोटी कागदपत्रे दाखवून अन्यत्र वर्ग केले. संचालक डॉ. जी. व्ही. परीशवाड यांनाही हाकलून बाहेर काढले. याबद्दल आम्ही त्या-त्यावेळी पोलिसांत तक्रारी केल्या आहेत. (प्रतिनिधी)
उगार शुगर्सचा प्रतिनिधी
उगार शुगर्सचा प्रतिनिधी म्हणून एमटीई सोसायटीवर माझी नियुक्ती झाली. त्यानंतर उगार शुगर्सने मला नियुक्तीपत्र दिले आहे. तसेच आजअखेर मी सोसायटीचा सभासदही आहे, असे स्पष्टीकरण विजय पुसाळकर यांनी यावेळी दिले.
दादागिरी त्यांच्याकडूनच...
पुणे तसेच सांगलीतील कार्यालयात पृथ्वीराज देशमुख यांच्या गटाकडून जो प्रकार झाला, तो दडपशाहीचाच प्रकार होता. आम्ही कधीच अशा गोष्टी केलेल्या नाहीत. दादागिरी त्यांच्याकडूनच झाली आहे, असे मत दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Deshmukh's relationship with Walchand? : Deepak Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.