शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतरही 'शक्तिपीठ महामार्गा'च्या भूसंपादनाची अधिसूचना जाहीर
By संतोष भिसे | Published: June 12, 2024 11:51 AM2024-06-12T11:51:55+5:302024-06-12T11:52:16+5:30
आक्षेपांवर सुनावणी नाही
संतोष भिसे
सांगली : राज्यभरातील शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधानंतरही शासनाने शक्तिपीठ महामार्ग रेटून नेण्याचे ठरविल्याचे स्पष्ट झाले आहे. महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना मंगळवारी जाहीर करण्यात आली. त्यावर २१ दिवसांपर्यंत हरकती घेता येणार आहेत.
सांगली जिल्ह्यात संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीची माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार कवठेमहांकाळ तालुक्यात घाटनांद्रे, तिसंगी, तासगाव तालुक्यात डोंगरसोनी, सिद्धेवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण, मणेराजुरी, मतकुणकी, नागाव कवठे, मिरज तालुक्यात कवलापूर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी येथील शेतजमिनी संपादित केल्या जाणार आहेत. पवनार ते पत्रादेवी (नागपूर - गोवा) महाराष्ट्र शक्तिपीठ द्रुतगती महामार्गासाठी या गावांतील जमिनी संपादित करण्यात येत असल्याचे शासनाच्या उपसचिव दीपाली नाईक यांनी अधिसूचनेत म्हटले आहे.
याबाबत आक्षेप असतील, तर मिरजेचे प्रांताधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांच्याकडे दाखल करावेत, असेही आवाहन केले आहे. यापूर्वी आक्षेप दाखल केलेल्या किंवा ज्यांच्या आक्षेपांवर सुनावणी झाली आहे, अशा शेतकऱ्यांना पुन्हा आक्षेप दाखल करता येणार नाहीत.
दरम्यान, शक्तिपीठ महामार्गात जिल्ह्यातील शेकडो एकर बागायत शेतजमीन जाणार असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी कमी मूल्यांकनाच्या कारणास्तव विरोध केला आहे. पण, शासनाने या विरोधाला न जुमानता भूसंपादनाची अधिसूचना काढल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पद्धतीने आता कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांतही अधिसूचना निघणार आहे.
आक्षेपांवर सुनावणी नाही
दरम्यान, शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासंदर्भात मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांकडे यापूर्वीच अडीच हजारांवर आक्षेप दाखल झाले आहेत. मात्र, त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. हा महामार्ग आवश्यक नसल्याने रद्द करावा, अशी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची मागणी आहे.
संपादित केली जाणारी गावनिहाय गटसंख्या अशी
घाटनांद्रे १०८, तिसंगी ४९, डोंगरसोनी ६६, सावळज २४, सिद्धेवाडी ४, अंजनी ६९, वज्रचौंडे ५१, गव्हाण १२, मणेराजुरी १५८, मतकुणकी ४२, नागाव कवठे १२६, कवलापूर १६९, बुधगाव ८४, कर्नाळ ७६, पद्माळे ६१, सांगलीवाडी ६३.