आरोपानंतरही सांगली जिल्हा बँकेस १८६ कोटी नफा, १२४ शाखांची १०० टक्के कर्ज वसुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 17:42 IST2025-04-11T17:41:51+5:302025-04-11T17:42:28+5:30
सांगली : राज्य सरकारची कर्जमाफीची घोषणा आणि विरोधकांकडून चुकीचे आरोप होऊनही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस १८६ कोटी रुपयांचा नफा ...

आरोपानंतरही सांगली जिल्हा बँकेस १८६ कोटी नफा, १२४ शाखांची १०० टक्के कर्ज वसुली
सांगली : राज्य सरकारची कर्जमाफीची घोषणा आणि विरोधकांकडून चुकीचे आरोप होऊनही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस १८६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तसेच जिल्हा बँकेच्या २१८ शाखांपैकी १२४ शाखांची १०० टक्के कर्ज वसुली तर ७७ शाखांची ९० टक्क्यांपेक्षा जास्त वसुली आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
मानसिंगराव नाईक म्हणाले, जिल्हा बँक अध्यक्षपदाचा पदभार २०२२ मध्ये घेतला. यावेळी बँकेस १३१ कोटी रुपयांचा नफा होता. नफ्यासह ठेवी आणि कर्जामध्ये वाढ करून जिल्हा बँकेचा नेट एनपीए आणि ग्रॉस एनपीए शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार ठेवी आठ हजार ८९७ कोटींवर झाल्या असून, कर्जाचे वाटप सात हजार ९६ कोटींपर्यंत केले आहे. गेल्या चार वर्षांत ठेवीमध्ये दोन हजार ६२ कोटी वाढ करून कर्ज वाटप दोन हजार ४१ कोटी रुपयेपर्यंत केले आहे. नफ्यामध्ये १२९ कोटींपर्यंत वाढ केली आहे.
३१ मार्च २०२२ मध्ये ग्राॅस एनपीए १४.३४ टक्क्यांवरून ७.५३ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. ५० टक्के एनपीए चार वर्षांत कमी केला असून, पुढील वर्षी ४ टक्क्यांपर्यंत कमी करणार आहे. नेट एनपीए मार्च २०२२ मध्ये ७.८१ टक्के होता. चार वर्षांनंतर तो शून्य टक्के केला आहे. गेल्या चार वर्षांत जिल्हा बँकेतील अधिकारी, कर्मचारी आणि संचालक मंडळाने विशेष मेहन घेऊन बँकेचा तोटा कमी करून नफ्यात वाढ केली आहे. ग्रॉस एनपीए आणि नेट एनपीए कमी केला आहे. सध्या जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली असून, राज्यातील टॉप फाइव्ह जिल्हा बँकेत सांगली जिल्हा बँकेचा समावेश झाला आहे. यामध्ये शेतकरी, सभासदांचेही मोठे योगदान आहे.
जिल्हा बँकेची अशी आहे आर्थिक स्थिती
- भागभांडवल : १९१ कोटी
- ठेवी : ८८९७ कोटी
- बाहेरील कर्जे : १४१२ कोटी
- गुंतवणूक : ३६२५ कोटी
- खेळते भांडवल : १२१५७ कोटी
- एकूण उत्पन्न : ८७४ कोटी
- एकूण खर्च : ६८८ कोटी
- ढोबळ नफा : १८६ कोटी
- एनपीए रक्कम : ५३४ कोटी
- ग्रॉस एनपीए प्रमाण : ७.५३ टक्के
- नेट एनपीए प्रमाण : शून्य
राज्यात टॉप फाइव्हमध्ये
राज्यातील जिल्हा बँकांमध्ये सर्वोत्कृष्ट चालणाऱ्या टॉप फाइव्ह बँकांमध्ये सांगली जिल्हा बँकेचा समावेश झाला आहे. पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा टॉप फाइव्हमध्ये समावेश असून, यामध्ये पाचवे स्थान सांगली जिल्हा बँकेला मिळाले आहे, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.