कोविड रुग्णालयातील दररोजचा कचरा १७० किलोचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 07:04 PM2020-05-27T19:04:15+5:302020-05-27T19:04:49+5:30
जैव वैद्यकीय कच-याचे निर्जंतुकीकरण करून कर्मचारी स्वतंत्र बॉक्समध्ये तो ठेवून देतो. त्यानंतर महापालिकेने नियुक्त केलेल्या सूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटी या संस्थेच्या स्वतंत्र वाहनातून हा कचरा प्रक्रिया केंद्रावर नेला जातो. तेथे तो नष्ट केला जातो. दररोज सरासरी १७० किलो कचरा कोरोनाशी संबंधित उपचार केंद्र, क्वारंटाईन कक्ष, प्रयोगशाळेतून गोळा होत आहे.
अविनाश कोळी-
सांगली : मिरजेतील कोविड रुग्णालय आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमधून दररोज १७० किलो जैव वैद्यकीय कचरा तयार होत असून, कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या कचºयाचे संकलन, वाहतूक व नष्ट करण्यासाठी तयार केलेले प्रक्रिया केंद्र यापर्यंतचा प्रवास अत्यंत सुरक्षित साधनांद्वारे केला जात आहे.
मिरजेतील कोविड रुग्णालयात सध्या २० रुग्ण असून, विविध ठिकाणच्या संस्थात्मक अलगीकरण कक्षात १७७ रुग्ण आहेत. डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय व अन्य कर्मचा-यांची संख्याही अधिक आहे. प्रयोगशाळेतील यंत्रणा वेगळी आहे.
उपचारासाठी, तपासण्यांसाठी अनेक वैद्यकीय साधनांचा वापर होतो. मास्क, ग्लोव्हज, सिरिंज, औषधांच्या बॉटल्स व अन्य बरेचसे साहित्य दररोज टाकून द्यावे लागते. त्यामुळे दररोजचा कचरा तात्काळ नष्टही करावा लागतो. यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कोविड रुग्णालय, प्रयोगशाळा, संस्थात्मक अलगीकरण कक्षातील टाकून द्याव्या लागणा-या जैव वैद्यकीय कच-याचे निर्जंतुकीकरण करून कर्मचारी स्वतंत्र बॉक्समध्ये तो ठेवून देतो. त्यानंतर महापालिकेने नियुक्त केलेल्या सूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटी या संस्थेच्या स्वतंत्र वाहनातून हा कचरा प्रक्रिया केंद्रावर नेला जातो. तेथे तो नष्ट केला जातो. दररोज सरासरी १७० किलो कचरा कोरोनाशी संबंधित उपचार केंद्र, क्वारंटाईन कक्ष, प्रयोगशाळेतून गोळा होत आहे.
असा नष्ट केला जातो कचरा
रुग्णालय, प्रयोगशाळा व अलगीकरण कक्षातील कर्मचारी तेथील कचरा एक टक्का हायपोक्लोराईडने निर्जंतुकीकरण करून घेतात.एका बॉक्समध्ये हा कचरा बंदिस्त केला जातो. त्या बॉक्सवर पुन्हा हायपोक्लोराईड फवारणी होते.
बॉक्सवर वेगळा बारकोड टाकला जातो.नियुक्त खासगी संस्थेचे वाहन येऊन बारकोड स्कॅन करते आणि कचरा वाहनात घेतला जातो. कुपवाड एमआयडीसीमधील प्रक्रिया केंद्रावर तो उतरविला जातो यंत्रात ८५० अंश तापमानात इन्सिनरेशन प्रक्रिया (जाळणे) करून तो नष्ट होतो.
कर्मचा-यांची काळजी
कचरा संकलन करणाºया संस्थेचा कर्मचारी फेस शिल्ड, ग्लोव्हज वापरतो. प्रक्रिया केंद्रावर तो कचरा नष्ट झाल्यानंतर त्याचा गणवेश निर्जंतुकीकरण करून आंघोळ करून तो दुसरे कपडे घालून निघून जातो. कोविड रुग्णालयातील कचºयासाठी व क्वारंटाईन केंद्रासाठी स्वतंत्र वाहने आहेत.
अत्यंत सुरक्षा बाळगून कचरा वेगळा
जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे यांनी सांगितले की, अत्यंत सुरक्षा बाळगून कोविड रुग्णालय व क्वारंटाईन सेंटरमधील कचरा वेगळा करून तो बंदिस्त व निर्जंतुकीकरण केला जातो. नागरिकांनी, औषध दुकानदारांनी किंवा जे लोक दररोज वापरून टाकावे लागणारे ग्लोव्हज, मास्कचे निर्जंतुकीकरण करून ते बंदिस्त करून कचरा गाडीत वर्गीकृत डब्यात टाकावे. सार्वजनिक ठिकाणी ते टाकणे किंवा जाळणे योग्य नाही.
नियमांचे पालन केले जाते
सूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटीच्या संचालिका मेघना कोरे यांनी सांगितले की, दररोजचे कचरा संकलन करताना सतर्कता, सुरक्षितता आम्ही बाळगतो. महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे, नियमांचे पालन केले जात आहे. दररोजच्या कचरा संकलनाची व त्याची विल्हेवाट लावल्याची माहितीही कार्यालयाला द्यावी लागते. कर्मचाºयांच्या सुरक्षिततेची सर्वाधिक काळजी घेतली जात आहे