विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विध्वंस रोखायला हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:34+5:302021-06-22T04:18:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या नावाखाली सुरू असणारा पर्यावरणाचा विध्वंस रोखायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या नावाखाली सुरू असणारा पर्यावरणाचा विध्वंस रोखायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. येथील सत्यशोधक प्रबोधिनीतर्फे पर्यावरणदिनी आयोजित ‘डिजिटल सत्यशोधक संवाद’ या ऑनलाइन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
‘पर्यावरणपूरक विकास नीती’ या विषयावर त्यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, सत्ताधारी नैसर्गिक संसाधनांशी खेळ करत आहेत. निसर्गाचा रास सुरू आहे. याचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. विरोधात आवाज उठवणाऱ्या पर्यावरणवाद्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. विध्वंस रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर लढा उभारावा लागेल. पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचा पर्याय पुढे आणावा लागेल. अन्यथा कोरोनासारख्या संकटांना सामोरे जावे लागेल.
त्या म्हणाल्या, प्रस्तावित कृषी कायद्यांमुळे शेतीचे बाजारीकरण होईल. रेशन व्यवस्था आणि अन्नसुरक्षा संपुष्टात येऊन सर्वसामान्यांना जगणे मुश्कील होईल. याचाही विचार करावा लागेल. प्रास्ताविकात महेश माने म्हणाले, पर्यावरण उद्ध्वस्त करणाऱ्या कुटनीतीमुळे नैसर्गिक आपत्ती येत आहेत. पर्यावरणाला वाचवले नाही तर माणसाला कोणीच वाचवणार नाही.
कार्यक्रमाला संपतराव पवार, डॉ. रवींद्र श्रावस्ती, ॲड. संदेश पवार, विकास मगदूम, दिगंबर माळी, स्वप्निल पाटील, वरद नागठाणे, रोहित माळी, नसीम गवंडी, सना पटेल, चैताली गुरव, सौरभ डांगे, अलंकार जाधव, सूरज बरगाले, प्रसाद माळी, असिम पठाण, वैभव आटुगडे, अभिषेक ढाले, अभिषेक जवंजाळ, कुणाल काळोखे आदी उपस्थित होते.