तासगावातील स्वच्छतेच्या वादग्रस्त ठेक्याची सखोल चौकशी होणार... मुख्याधिकाºयांचा इशारा : राष्टÑवादीच्या संस्थांचे बोगस दाखले जोडून घेतला ठेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:33 PM2018-01-18T23:33:20+5:302018-01-18T23:35:52+5:30
तासगाव : तासगाव नगरपालिकेकडील स्वच्छतेचा कोट्यवधी रुपयांचा ठेका मिळविण्यासाठी ठेकेदाराने बोगसगिरी केल्याचे चव्हाट्यावर आले आहे.
दत्ता पाटील ।
तासगाव : तासगाव नगरपालिकेकडील स्वच्छतेचा कोट्यवधी रुपयांचा ठेका मिळविण्यासाठी ठेकेदाराने बोगसगिरी केल्याचे चव्हाट्यावर आले आहे. राष्टÑवादीशी असेलेल्या घरोब्याचा फायदा घेत, शहरातील राष्टÑवादीच्या ताब्यात असलेल्या तीन महत्त्वाच्या संस्थांकडील ठेक्याच्या अनुभवाचे दाखले पालिकेला सादर करण्यात आले आहेत. बोगस दाखले जोडून ठेका घेतल्याचे चव्हाट्यावर आले आहे. या ठेक्याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी दिला आहे.
शहरातील स्वच्छतेचा २००७ पासून बीव्हीजी कंपनीकडे असलेला ठेका रद्द करून विद्यमान सत्ताधाºयांनी, राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयाला ठेका दिला. ठेका देत असताना ठेकदाराने नियमांची अंमलबजावणी केली नाही. याउलट ठेका पदरात पाडून घेण्यासाठी अनेक बोगस कागदपत्रे जोडण्यात आल्याचे चव्हाट्यावर आले आहे. तासगाव नगरपालिकेचा स्वच्छतेसाठीचा महिन्याला ८ लाख ७२ हजार रुपये किंमतीचा ठेका होता. हा ठेका मिळविण्यासाठी यापूर्वी या किंमतीएवढा ठेका घेऊन काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक होते.
हा ठेका पदरात पाडून घेण्यासाठी संबंधित ठेकेदाराने राष्टÑवादीशी असलेल्या घरोब्याचा पुरेपूर फायदा करुन घेतला. राष्टÑवादीच्या ताब्यात असलेल्या स्वामी रामानंद भारती सूतगिरणी, तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आर. आर. पाटील खरेदी-विक्री संघांकडे ठेका घेऊन काम केल्याचे दाखले पालिकेला सादर करण्यात आले आहेत. वास्तविक या तीनही संस्थांकडे अशाप्रकारचे कोणतेही काम संबंधित ठेकेदाराने केलेले नाही.
दरम्यान, बुधवारी ‘लोकमत’मध्ये ‘कोटीच्या ठेक्यासाठी नियमांच्या चिंधड्या’ या मथळ्याखाली नियमबाह्य ठेकेदारीबाबत बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. त्याची दखल घेत मुख्याधिकारी वायकोस यांनी करारनाम्यातील सर्व कागदपत्रांची तपासणी करणार असल्याचे सांगितले. दाखल्यांची तपासणी करण्यासाठी संबंधित संस्थांकडूनही खुलासा मागविण्यात येणार आहे. या प्रकरणात ठेकेदार दोषी आढळल्यास त्याच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी वायकोस यांनी दिला.
बिलाबाबत पुनर्विचार
ठेकेदाराच्या स्वच्छतेबाबतीत अनेक तक्रारी आहेत. नियमानुसार स्वच्छता होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ठेकेदाराने डिसेंबर महिन्यात केलेल्या कामाच्या बिलाबाबत पुनर्विचार करुनच बिल देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी वायकोस यांनी दिली.
संस्थांचा मासिक ठेका
राष्टÑवादीच्या ताब्यात असलेल्या तीन संस्थांचा स्वच्छतेचा ठेका असल्याबाबतचे दाखले जोडण्यात आले आहेत. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचा ३ लाख १३ हजार रुपयांचा, आर. आर. पाटील खरेदी-विक्री संघाचा १ लाख २० हजार रुपयांचा आणि स्वामी रामानंद भारती सूतगिरणीचा ६ लाख २६ हजार रुपयांचा मासिक ठेका असल्याची पत्रे पालिकेला सादर करण्यात आली आहेत.
राष्टÑवादीचा घरोबा, भाजपची सोयरिक पथ्यावर
स्वच्छतेचा ठेका घेतलेला ठेकेदार राष्टÑवादीचा पदाधिकारी आहे. बोगस कागदपत्रे मिळवण्यासाठी त्याला राष्टÑवादीचा घरोबा पथ्यावर पडला, तर ठेका मिळवण्यासाठी भाजपच्या एका नगरसेवकासोबत केलेली ‘आर्थिक’ सोयरिक सोयीस्कर ठरली.