शोषण शक्तींविरोधी संघर्षाचा निर्धार
By admin | Published: September 23, 2016 11:38 PM2016-09-23T23:38:39+5:302016-09-23T23:38:39+5:30
परिवर्तनवादी कार्यकर्ते उपस्थित : इस्लामपूर येथे लोकशाही संघर्ष यात्रेचे स्वागत
इस्लामपूर : भारतीय संविधानाला आव्हान देत लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून शोषण करणाऱ्या प्रतिगामी शक्तींविरुध्दचा लढा पूर्ण त्वेषाने लढायला हवा, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेतून नवसमाज निर्मितीसाठी संघर्ष करण्याचा निर्धार राजकुमार तांगडे यांनी व्यक्त केला.
लोकशाही रक्षण आणि संघर्ष यात्रेच्या पुण्याहून निघालेल्या जथ्याचे शुक्रवारी सकाळी इस्लामपुरात आगमन झाले. पंचायत समिती आवारातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ परिवर्तनवादी चळवळीतील प्रा. बी. आर. जाधव, प्रा. एल. डी. पाटील, बी. जी. पाटील, दीपक कोठावळे यांनी या जथ्याचे स्वागत केले. त्यानंतर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. तांगडे म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन करुन ज्या भूमीत क्रांतीची बीजे रोवली, तेथून क्रांतीची पे्ररणा घेऊन ही संघर्ष यात्रा पुढे जाणार आहे. प्राचार्य विश्वास सायनाकर म्हणाले, संविधान वाचविण्यासाठी प्रतिगाम्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणावा लागेल. लोकशाही वाचविण्यासाठीच्या संघर्ष यात्रेत प्रत्येकाने सहभागी व्हावे.
संजय बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. एल. डी. पाटील यांनी आभार मानले. यावेळी डॉ. बाबूराव गुरव, कॉ. धनाजी गुरव, नामदेव परमणे, नीरज जैन, प्रकाश कांबळे यांच्यासह परिवर्तनवादी कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)