सांगलीच्या हळद पावडरचा ‘फुले’ ब्रँड विकसित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:31 AM2021-08-21T04:31:01+5:302021-08-21T04:31:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : हळद महाराष्ट्रातील प्रमुख नगदी मसाला पीक आहे. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधे, सौंदर्यप्रसाधने, जैविक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : हळद महाराष्ट्रातील प्रमुख नगदी मसाला पीक आहे. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधे, सौंदर्यप्रसाधने, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो. लागवडीनंतर उत्पादित हळदीचे मूल्य वाढविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. यासाठी हळद प्रक्रिया उद्योगातून तयार होणाऱ्या हळद पावडरचा ‘फुले हळद’ या नावाचा ब्रँड विकसित करा, असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले.
कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील कृषि संशोधन केंद्रातील आयोजित कार्यक्रमात कुलगुरु डॉ. पाटील बोलत होते. ते म्हणाले की, ज्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते असेल, त्यावर संशोधन जादा करुन नवनवीन वाण विकसीत करण्याची गरज आहे. जमिनीचे आरोग्य संतुलित राहण्यासाठी पिकांना कमी पाणी वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये शास्त्रज्ञांनी जागृती केली पाहिजे. भविष्यात शेतीसाठी पाणी वाटप मशीनद्वारेच होणार आहे.
संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दिलीप कठमाळे यांनी कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सभासद शेतकरी प्रशांत पाटील, रवी पाटील, शरद पवार, प्रमोद पाटील यांनी अनुभव कथन केले.
यावेळी डॉ. भरत पाटील, डॉ. मिलिंद देशमुख, डॉ. श्रीमंत राठोड, डॉ. मनोज माळी, डॉ. संजय तोडमल, डॉ. राजेंद्र भाकरे उपस्थित होते. हळद संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्रीमंत राठोड यांनी आभार मानले. रमेश पाटील, प्रतापसिंह पाटील, प्रशांत पवार यांनी शिवार फेरीचे नियोजन केले.