विकासाची गुढी उभारणार
By admin | Published: March 24, 2017 11:43 PM2017-03-24T23:43:16+5:302017-03-24T23:43:16+5:30
महापालिका अंदाजपत्रक : सभापतींकडून महिला सुरक्षेसह अनेक घोषणांचा पाऊस
शीतल पाटील ल्ल सांगली
‘चैतन्याची गुढी उभारू, शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प धरू’, असा आशावाद व्यक्त करीत स्थायी समिती सभापती संगीता हारगे यांनी शुक्रवारी महापालिकेच्या ६४३ कोटींच्या अंदाजपत्रकात घोषणांचा पाऊस पाडला. कुपवाड ड्रेनेज योजना व मिरज पाणीपुरवठा योजना पूर्ततेचे स्वप्नही सत्यात उतरविण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला आहे. शहराच्या गुंठेवारी भागातील विकासासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करून या भागातील प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. महापौर, उपमहापौर निधीसह नगरसेवक यांच्या विकास निधीत वाढ करून त्यांनाही खूश केले आहे.
महिला उद्योग मेळावा
महापालिकेकडून अनेक महिला बचत गटांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. अनेक महिला वैयक्तिक व बचत गटामार्फत छोटे-मोठे व्यवसाय करतात. अशा उद्योजिका महिलांना व बचत गटांना एकत्र करून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिकेच्यावतीने महिला उद्योग मेळावा भरविण्यासाठी सभापती हारगे यांनी १० लाख रुपयांची तरतूद केली आहे.
महिला कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन
महापालिकेकडे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सभापती हारगे यांनी अंदाजपत्रकात विविध संकल्प केले आहेत. पालिका वर्धापन दिनानिमित्त या महिलांचा सत्कार व ‘आदर्श माता’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी ४ लाखांची तरतूद केली आहे.
गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही
महिला व तरुणींच्या सुरक्षेच्यादृष्टीने गर्दीच्या ठिकाणी व अत्यावश्यक जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची शिफारसही सभापतींनी केली आहे. त्यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय महिलांकरिता स्वच्छतागृहे बांधण्यासाठी तरतूद केली आहे. महापालिका मुख्यालय परिसर व शहर पोलिस ठाण्याच्या परिसरात इलेक्ट्रिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी १२ लाखांची तरतूद केली आहे.
वसंतदादा जन्मशताब्दीसाठी तरतूद
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष यंदा साजरे केले जात आहे. त्यानिमित्त महापालिकेच्यावतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी १५ लाखांची तरतूद करण्यात आली असून, प्रशासनाने कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे, असा मनोदयही सभापतींनी व्यक्त केला आहे. याशिवाय क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा परिसराच्या विकासासाठीही २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
पदाधिकारी, नगरसेवकांत खुशी
अंदाजपत्रकात महापौर व स्थायी सभापतीसाठी १ कोटी २० लाख, तर उपमहापौरासाठी ८० लाख, गटनेत्यासाठी ७५ लाख, विरोधी पक्षनेत्यासाठी ५० लाख, स्वाभिमानी गटनेत्यासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवकांनाही प्रत्येकी २० लाखांचा निधी देण्यात आला आहे. स्थायी समितीच्या सोळा सदस्यांसह इतर नगरसेवकांना प्रत्येकी ३० ते ४० लाखांच्या निधीची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
थम्ब इंप्रेशन यंत्रणा बसवावी
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेचे अंगिकरण व्हावे, यासाठी तत्कालीन आयुक्तांनी थम्ब इंप्रेशन यंत्रणा बसविली होती. पण ही यंत्रे नादुरुस्त झाल्याने प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे. यंत्रे नादुरुस्त झाल्याने कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नाहीत. त्याचा त्रास केवळ लोकप्रतिनिधींनाच नव्हे, तर नागरिकांनाही होतो. त्यामुळे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी थम्ब इंप्रेशन यंत्रणा त्वरित बसवावी, अशी शिफारसही सभापती हारगे यांनी केली आहे.
राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांसाठी निधी
मिरजेत महात्मा बसवेश्वर, अहिल्यादेवी होळकर, इंदिरा गांधी यांचे पुतळे सुशोभिकरणासाठी अंदाजपत्रकात ५० लाखांची तरतूद केली आहे. याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सांस्कृतिक केंद्र विकसित करण्यासाठी ३० लाखांची तरतूद केली आहे.
अपूर्ण योजनांची पूर्तता
महापालिकेच्या सांगली, मिरज ड्रेनेज योजना, ५६ व ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र, मिरजेची पाणीपुरवठा योजना पुढील काळात पूर्ण करण्याचा संकल्प सभापतींनी अंदाजपत्रकात व्यक्त केला आहे. त्याशिवाय कुपवाड ड्रेनेज योजनेसाठी पाठपुरावा करून ही योजना लवकरात लवकर मंजूर करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला आहे.