महिलांसाठी उद्योगधंदे उभारणार
By Admin | Published: January 23, 2016 12:15 AM2016-01-23T00:15:35+5:302016-01-23T00:50:48+5:30
सुप्रिया सुळे : कवठेमहांकाळमध्ये महिला मेळावा उत्साहात
कवठेमहांकाळ : ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणासाठी व सक्षमीकरणासाठी राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने भविष्यात ठोस पावले उचलली जातील. तसेच तासगाव, कवठेमहांकाळच्या दुष्काळी माळरानावर महिलांसाठी उद्योगधंदे उभारू व त्यांना आधार देऊ, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली कवठेमहांकाळच्या महांकाली साखर कारखाना महिला मंडळाच्यावतीने महिला मेळावा घेण्यात आला होता. याप्रसंगी सुप्रिया सुळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आ. सुमनताई पाटील होत्या.खासदार सुळे म्हणाल्या, सध्या जग बदलत असून महिला या कुटुंबाचा, समाजाचा प्रमुख कणा बनत आहेत. कुटुंबाचा, समाजाचाविकास व्हायचा असेल, तर महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी दिली पाहिजे. तसेच त्यांच्या शिक्षणाकडेही प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. तासगाव, कवठेमहांकाळ हा कायमस्वरुपी दुष्काळी पट्टा आहे. यावर्षी पाऊस न झाल्याने येथील शेती व शेतकरी धोक्यात आलेला आहे. भविष्यात या भागात महिलांसाठी मोठे उद्योगधंदे उभे करू आणि त्यांना विकासाची संधी देऊ, असे त्या म्हणाल्या. यावेळी उषाताई दशवंत, महांकाली महिला मंंडळाच्या अध्यक्षा अनिताताई सगरे, स्मिता पाटील यांचीही भाषणे झाली. माजी सभापती सुरेखाताई कोळेकर यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास महिला, बालकल्याण सभापती राधाताई हाक्के , उषाताई माने, आशा पाटील, कल्पना घागरे, विमलताई बंडगर, साधना कांबळे, अनुराधा सगरे उपस्थित होत्या. महिला मेळाव्याचे संयोजन कवठेमहांकाळचे उपसरपंच चंद्रशेखर सगरे, रूस्तुम शेकडे, बंडा कोळेकर यांनी केले. (वार्ताहर)