आयुक्त कापडणीस यांच्यामुळे विकासाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:06 AM2021-01-13T05:06:43+5:302021-01-13T05:06:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापूर, कोरोनासारखा नैसर्गिक आपत्तीचा सामना करत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापूर, कोरोनासारखा नैसर्गिक आपत्तीचा सामना करत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिका क्षेत्राच्या विकासाला चालना दिली आहे. कोरोना योद्धा पुरस्कार हा त्यांच्या कामाची पोहोच पावतीच आहे, असे गौरवोद्गार कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी काढले.
श्री सिद्धिविनायक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयुक्त कापडणीस यांचा 'कोरोना योद्धा' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी मंत्री कदम बोलत होते. यावेळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, युवा नेते विशाल पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, संस्थेचे अध्यक्ष अमर निंबाळकर, सचिव नगरसेविका वर्षा निंबाळकर, नगरसेवक मनोज सरगर, मंगेश चव्हाण उपस्थित होते.
कदम म्हणाले, आयुक्त कापडणीस यांनी कोरोना काळात चांगले काम केले. सूक्ष्म नियोजन करून हॉस्पिटल उभा केले. त्यामुळे अनेक रुग्णांना फायदा झाला. याचबरोबर शहरांच्या विकासकडेही आयुक्तांनी विशेष लक्ष दिले. प्रतिकूल परिस्थिती असतानाही शहरांचा कायापालट केला. महापालिका क्षेत्रातील प्रमुख चौकांचे विविध सामाजिक संस्था, संघटना, उद्योग समूह इ.मार्फत सुशोभिकरण करून घेऊन शहराच्या सौंदर्यात मोठ्या प्रमाणावर भर घातली आहे. कोरोना योद्धा हा पुरस्कार त्यांच्या या कामाची पोहोच पावतीच आहे.
संस्थेचे अध्यक्ष अमर निंबाळकर म्हणाले, आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक धाडसी निर्णय घेतले. प्रशासनाला शिस्त लावली. शहरांचा विकास डोळ्यासमोर ठेवून ते काम करत आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून आमराईचा कायापालट होत आहे. शहरातील प्रत्येक चौकांचे सुशोभीकरण झाले आहे. याचे सारे श्रेय आयुक्तांना जाते, असे त्यांनी सांगितले.
फोटो ओळी : येथील श्री सिद्धिविनायक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयुक्त नितीन कापडणीस यांचा मंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते 'कोरोना योद्धा' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, उत्तम साखळकर, अमर निंबाळकर, वर्षा निंबाळकर, मनोज सरगर, मंगेश चव्हाण उपस्थित होते.