सांगलीत आयटी हब तयार करण्यासाठी डेव्हलपमेंट फोरमचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 04:39 PM2022-09-06T16:39:02+5:302022-09-06T16:39:47+5:30
सांगलीतून हजारो तरुण आयटी क्षेत्रात कामासाठी पुणे, मुंबई, बंगळुरु, हैदराबादमध्ये राहत आहेत. सांगलीत आयटी हब झाल्यास या तरुणांना संधी मिळेल.
सांगली : सांगलीत आयटी हबला मोठा वाव आहे. हब झाल्यास शहराची श्रीमंती वाढायला वेळ लागणार नाही असा विश्वास आयटी उद्योजक प्रसन्न जोशी यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित सांगली डेव्हलपमेंट फोरमच्या बैठकीत ते बोलत होते. उद्योजक रवींद्र माणगावे, सागर वडगावे, भालचंद्र पाटील, संजय अराणके आदी यावेळी उपस्थित होते.
सांगलीच्या थिजलेल्या औद्योगिक विकासाला चालना आणि नवी दिशा देण्यासाठी बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्यातील उद्योजक व व्यावसायिकांसाठी जगभरात उपलब्ध संधी, निर्यातीच्या वाटा, उद्योगांच्या विस्तारातील अडथळे, नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन या विषयावर विचारमंथन झाले. सांगली व पुण्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेले जोशी म्हणाले, सांगलीतून हजारो तरुण आयटी क्षेत्रात कामासाठी पुणे, मुंबई, बंगळुरु, हैदराबादमध्ये राहत आहेत. सांगलीत आयटी हब झाल्यास या तरुणांना संधी मिळेल. नव्याने शिकून बाहेर पडणाऱ्यांनाही जिल्ह्यातच रोजगार मिळेल. शिवाय सांगलीची आर्थिक उलाढाल कित्येक पटींनी वाढेल. यासाठी देशातून किंवा विदेशातून मोठा आयटी उद्योग सांगलीत आणावा लागेल. त्यासाठी सांगली डेव्हलपमेंट फोरम व महाराष्ट्र चेंबरने ताकद लावावी.
माणगावे म्हणाले, जिल्ह्यात व्यवसाय व उद्योग वाढीसाठी आयटी हबची मदत होईल. पायाभूत सुविधांसाठी शासनाकडेही पाठपुरावा करावा लागेल.
अराणके म्हणाले, उद्योगांना परदेशी कंपन्यांकडून कामाची संधी आणि येथील उत्पादनांची निर्यात याकामी चेंबरने समन्वयक म्हणून काम करावे.
बैठकीला मारुती माळी, रमेश आरवाडे, विलास गोसावी, स्वप्नील शहा, सुदर्शन हेरले, सुधीर बाबर, नानासाहेब पाटील हेदेखील उपस्थित होते.
जिल्ह्याचे मनुष्यबळ बाहेर जाणे हानिकारक
सागर वडगावे म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या संख्येने सुशिक्षित तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. हे प्रशिक्षित मनुष्यबळ जिल्ह्याबाहेर जाणे म्हणजे जिल्ह्याची मोठी हानी आहे. ते येथेच रुजावे आणि जिल्ह्याच्या विकासाला फायदा व्हावा यादृष्टीने काम करावे लागेल. एखादी मोठी मदर इंडस्ट्री हाच त्यावरील उपाय आहे.