विकासकामे, व्यसनमुक्तीमुळे गावांची प्रगती
By admin | Published: June 21, 2015 11:18 PM2015-06-21T23:18:42+5:302015-06-22T00:13:43+5:30
शरद पवार : इनामधामणी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन
मिरज : आरोग्य, शिक्षण, स्वच्छतेसोबतच व्यसनमुक्तीमुळे गावांचा विकास शक्य आहे. विकास कामांसाठी निधी कसा मिळवावा, याचे इनामधामणी हे चांगले उदाहरण असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सांगितले. इनाम धामणी (ता. मिरज) ग्रामपंचायतीच्या २४ कोटी रूपये खर्चाच्या विविध विकासकामांचे व ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन खा. शरद पवार यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रकाश आवाडे होते.
धामणी ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांचे कौतुक करून, ही कामे चांगली कशी राहतील, गावात स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यासोबतच व्यसनमुक्तीची काळजी घेऊन आदर्श गाव बनविण्यासाठी प्रयत्न करा, असा संदेश खा. पवार यांनी दिली. खा. पवार म्हणाले, धामणी ग्रामपंचायतीने थोर कर्तृत्ववान व्यक्तींच्या नावे स्वागत कमानी उभारून इतिहासाचे स्मरण केले आहे. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील निधी मिळविण्यात पटाईत आहेत. गावाच्या विकासासाठी बाहेरून निधी उपलब्ध करून त्यांनी चांगला आदर्श कार्यक्रम राबविला आहे.
सरपंच मालुश्री पाटील यांनी, गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांची माहिती दिली. विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावात अंतर्गत व प्रमुख रस्ते, पाणी पुरवठा योजना, प्रत्येक समाजाचे समाजमंदिर, ज्येष्ठ नागरिकांना सुविधा आदी २४ कोटी रूपयांची विकासकामे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचे नेतृत्व प्रेरणादायी असल्याचे विठ्ठल पाटील यांनी सांगितले. धामणी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे व अण्णासाहेब मगदूम सभागृहाचे उद्घाटन खा. शरद पवार यांच्याहस्ते झाले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मार्ग बस थांबा, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवीर उमाजी नाईक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा बसवेश्वर महाराज, संत रोहिदास या प्रवेशद्वारांचे उद्घाटन करण्यात आले. गावातील कचरा गोळा करणाऱ्या अत्याधुनिक घंटागाडीचे उद्घाटन जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, माजी आमदार विलासराव शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, वसंतदादा कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब मगदूम, सुरेश पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, अशोक स्वामी, गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, उपसरपंच आप्पासाहेब सवदे अंकलीचे सरपंच किरण कुंभार उपस्थित होते. जितेंद्र कोलप यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
निधी खेचण्यात पटाईत
खासदार पवार यांनी इनामधामणी ग्रामपंचायतीने गावात केलेल्या विकास कामांबाबत प्रशंसा केली. ते म्हणाले की, आदर्श गाव बनविण्यासाठी ग्रामपंचायतीने आरोग्य, शिक्षण, स्वच्छता या क्षेत्रांत विशेष काम करावयास हवे. सुदैवाने इनामधामणी गावास वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्यासारखे चांगले नेतृत्व लाभले आहे. ते निधी खेचून आणण्यात पटाईत आहेत. त्यामुळेच शासनाकडून कोट्यवधींचा निधी गावास मिळून मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात येत आहेत. हे गावच्या विकासाचे, प्रगतीचे चांगले लक्षण आहे.