विकासकामे बाजूला; निधी वाटपावरच संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:50 AM2020-12-17T04:50:33+5:302020-12-17T04:50:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कोरोना महामारीचे संकट निवळत असतानाच, डेंग्यूसारखे आजार फैलावत आहेत. त्यातच वाढीव वीजबिल, वाढलेला मालमत्ता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोना महामारीचे संकट निवळत असतानाच, डेंग्यूसारखे आजार फैलावत आहेत. त्यातच वाढीव वीजबिल, वाढलेला मालमत्ता कर आदींच्या नोटिसांनी सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे. शहरातील विविध विकासकामे अर्धवट अवस्थेत आहेत. याचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री जयंत पाटील यांनी सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून दोन कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. याचे नियोजन होण्याअगोदरच निधी वाटपावरून पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांत संघर्ष चालू झाला आहे.
कोरोना महामारीत शहरातील विविध विकास कामांना ब्रेक लागला आहे. अस्वच्छता, खड्डेमय रस्ते, कोलमडलेली वाहतूक व्यवस्था, याशिवाय शहरातील खाेळंबलेली विकासकामे यामुळे नागरिक त्रस्त आहेत. असे असताना पालिका प्रशासनाचे मात्र याकडे साेयीस्कर दुर्लक्ष हाेत आहे. परिणामी नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी गांभीर्याने पहिलेच नाही. अखेर जनतेनेच हे प्रश्न पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासमाेर मांडले. त्यानंतर मंत्री पाटील यांनी शहरात पुन्हा लक्ष घालत असल्याचे सांगत, विकासासाठी दोन कोटी रुपये दिले.
या निधी वाटपाचे राजकारण आता पेटले आहे. या निधीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न विरोधी राष्ट्रवादी सदस्यांनी चालविला असला तरी, यांच्यातही अंतर्गत मतभेद दिसून येतात. निधी वाटपाचे राजकारण करण्यापेक्षा नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे
कोट
आमच्या युती शासनाच्या काळात माझ्यासारख्या सामान्य भाजपच्या पदाधिकाऱ्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावतीने १२ कोटींचा अतिरिक्त निधी पालिकेत आणला आहे.
- विक्रमभाऊ पाटील
गटनेते विकास आघाडी
कोट
इस्लामपूरच्या विकास कामांचा आलेख वाढण्याऐवजी उतरला आहे. म्हणूनच आमचे नेते जयंत पाटील शहराच्या विकासाला पुन्हा गती देण्यासाठी निधी उपलब्ध करत आहेत. येथून पुढेही निधी देणार आहेत. आता विकासाला गती येईल.
- शहाजी पाटील
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी
----------------------------
नगरपालिका लोगो वापरावा