मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येईनात; सांगलीतील विकासकामांची उद्घाटने होईनात
By शीतल पाटील | Published: November 25, 2023 01:25 PM2023-11-25T13:25:32+5:302023-11-25T13:25:59+5:30
शीतल पाटील सांगली : विकासकामांच्या उद्घाटनाला नेते, मंत्री हवेत, असा आग्रह सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते धरतात. त्यात चुकीचेही काही ...
शीतल पाटील
सांगली : विकासकामांच्या उद्घाटनाला नेते, मंत्री हवेत, असा आग्रह सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते धरतात. त्यात चुकीचेही काही नाही; पण काहीवेळा मंत्री, नेत्यांचा दौरा लांबणीवर जातो आणि कामांची उद्घाटनेच होत नाहीत. असाच काही प्रकार सांगलीत सुरू आहे. नवीन पोलिस मुख्यालय बांधून तयार आहे; पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस हेच उपलब्ध नसल्याने पाच महिन्यांपासून उद्घाटन झालेले नाही. नवीन नाट्यगृहाचे या दोन्ही नेत्यांच्या हस्ते भूमिपूजनाचाही घाट घातला आहे; पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काही सांगलीला येईनात आणि उद्घाटने काही होईनात, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
नवीन पोलिस मुख्यालय
विश्रामबाग येथील पोलिस मुख्यालयाची इमारत जुनी झाल्याने नवीन इमारतीला मंजुरी मिळाली. दोन वर्षांत दिमाखदार नवीन इमारतही उभी राहिली. नव्या इमारतीमुळे सर्वच विभागांचे काम एकाच ठिकाणाहून सुरू होणार आहे. नवीन मुख्यालय तयार होऊन पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला; पण अद्याप त्याचे उद्घाटन झालेले नाही. उद्घाटनाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस हवेत, असा भाजपचा आग्रह आहे.
कुपवाड ड्रेनेज योजना
कुपवाड शहरासाठी अडीचशे कोटींची ड्रेनेज योजना मंजूर झाली असून निविदाही काढण्यात आली. ठेकेदाराकडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. निविदा मंजूर होऊन तीन महिने झाली तरी अद्याप योजनेचा शुभारंभ झालेला नाही. कारण काय तर उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही.
महापालिकेचे नवीन नाट्यगृह
महापालिकेच्या जागेत नवीन नाट्यगृह उभारणीसाठी २५ कोटींचा निधी मिळाला आहे. महापालिकेच्या तांत्रिक मंजुरीनंतर आता प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. तत्पूर्वीच नाट्यगृहाचे भूमिपूजन करण्याचा भाजपचा विचार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हवेत.
हरिपूर-कोथळी पूल
हरिपूर-कोथळीदरम्यान कृष्णा नदीवर नवीन पूल उभारण्यात आला आहे. या पुलाचे उद्घाटनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार होते; पण ते काही सांगली दौऱ्यावर आले नाहीत. शेवटी पुलाचे उद्घाटन करून तात्पुरती वाहतूक सुरू करण्यात आली.
..आता अधिवेशनानंतरच मुहूर्त
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगली दौऱ्यावर येणार होते. तेव्हा या विकासकामांची उद्घाटने घेण्याचा भाजपाचा प्रयत्न होता; पण जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमच झाला नाही. त्यामुळे दोन्ही नेते सांगली दौऱ्यावर आले नाहीत. आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतरचा मुहूर्त काढण्यात आला आहे.