विकासाभिमुख नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:19 AM2021-07-16T04:19:14+5:302021-07-16T04:19:14+5:30
ॲड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर म्हटलं की, जत तालुक्यातील एक स्वच्छ, चारित्र्यवान, उच्चशिक्षित, अभ्यासू नेतृत्व डोळ्यासमोर उभे राहते. धिप्पाड शरीरयष्टी व ...
ॲड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर म्हटलं की, जत तालुक्यातील एक स्वच्छ, चारित्र्यवान, उच्चशिक्षित, अभ्यासू नेतृत्व डोळ्यासमोर उभे राहते. धिप्पाड शरीरयष्टी व सकारात्मक ध्येयबोली असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. समाजकारण किंवा राजकारणात काम करत असताना वारसा आणि राजकीय वरदहस्त असणे अत्यंत आवश्यक असते, तरच कतृत्ववान व्यक्तीला आपले कर्तृत्व सिद्ध करता येते. ॲड. चन्नाप्पा (आण्णा) होर्तीकर यांनी राजकारणाचा वसा आणि वारसा राजारामबापू पाटील यांचे स्नेही व अनुयायी कॉम्रेड कल्लाप्पाण्णा होर्तीकर यांच्याकडून मिळाला आणि त्यांच्या चाणाक्ष बुद्धी चातुर्यावर त्यांनी तो अंगीकारला. वकिली व्यवसायातून समाजकारणात अचानक येऊनही गेल्या २० वर्षांहूनही अधिक काळ त्यांनी उमदीसह जत पूर्व भागाचा सर्वांगीण विकास केला आहे. फक्त विकास म्हणून विकास नाही, तर दूरदृष्टी ठेवून विकास करण्याची त्यांची धमक वेगळीच आहे. याची अनेक उदाहरणे आहेत.
जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करताना अण्णांनी लोककल्याणचे व्रत हाती घेऊन विकासाचा डोंगर उभा केला आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक व उमदी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर हे एक चांगले व्यक्तिमत्त्व उमदी भागाला लाभलेले आहे.
चन्नाप्पाण्णा होर्तीकर हे कॉम्रेड कल्लाप्पाण्णा होर्तीकर यांचे पुतणे आहेत. जत तालुक्यातील सर्वांत मोठे एकत्र कुटुंब म्हणूनही होर्तीकर घराण्याचा नावलौकिक आहे. चन्नाप्पाण्णा होर्तीकर यांनी वयाच्या २३ व्या वर्षी वकिलीची परीक्षा पास केली. त्यांनतर त्यांनी सांगली व जत येथील न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. चार-पाच वर्षे प्रॅक्टिस करून त्यांनी राजकारणात येण्याचे ठरविले. पहिल्यांदा सध्याचे आमदार विक्रम सावंत यांचा उमदी जिल्हा परिषद गटात पराभव करून ते विक्रमी मताने निवडून आले. त्यावेळेपासून त्यांनी राजकारणात पाय रोवले. ते आजही जतच्या राजकारणात टिकून आहेत. ॲड. होर्तीकर यांनी उमदीसारख्या तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीवर सलग १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता अबाधित ठेवली होती. तसेच त्यांची बहीण रेश्माक्का होर्तीकर यांनादेखील उमदी जिल्हा परिषद गटातून निवडून आणून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही मिळवून दिले.
तालुक्यातील सर्वांत मोठ्या असलेल्या व नावाजलेल्या सर्वोदय शिक्षण संस्थेचे ते संचालक देखील आहेत. सर्वोदय शिक्षण संस्थेचे एका छोट्याशा रोपांचे वटवृक्षात रूपांतर करण्यात ॲड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. सर्वोदय शिक्षण संस्थेच्या ३५ हून अधिक शाखा आहेत. जतसारख्या दुष्काळी भागात देखील पहिलीपासून ते पदवीपर्यंतची शिक्षणाची सोय या संस्थेने केली आहे. कृषी विद्यालयपासून ते आश्रमशाळा असो अथवा गरीब मुलांच्यासाठी वसतिगृह, आदी सोयी या संस्थेने केल्या आहेत. गोरगरिबांच्या घरापर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी ॲड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर व होर्तीकर कुटुंब सतत कार्यरत असून, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना दिसून येते.
जत शहरात राष्ट्रवादी कार्यालय नव्हते; पण उमदीसारख्या छोट्या गावात ॲड. होर्तीकर यांनी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय सुरू करून लोकांचे प्रश्न या कार्यालयामार्फत सोडविले व युवकांची मोठी फळी उभारली आहे. आजदेखील त्यांच्या बाजूला युवकांचा गराडा पाहायला मिळतो. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याआधी त्यांचे वडील राजारामबापू पाटील यांच्याशी होर्तीकर घराण्याचे घनिष्ट संबंध होते. ते आजही टिकून आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे जत तालुक्याच्या राजकारणात चन्नाप्पाण्णा होर्तीकर यांना मानाचे स्थान आहे.
कोरोना काळात लॉकडाऊनमुळे मतदारसंघात कोणीही उपाशी राहू नये यासाठी त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले होते. स्वतः जिल्हा परिषद सदस्य असताना सर्वाधिक निधी उमदी मतदारसंघात त्यांनी खर्च केला होता. बहीण अध्यक्षपदी असताना तर त्यांनी तालुक्यातील इतर मतदारसंघांतही महत्त्वाच्या कामांसाठी निधी खेचून आणला होता. कितीही मोठ्या पदावर गेले तरी पाय जमिनीवर ठेवून तळागाळातील जनतेशी नाळ जुळलेले नेतृत्व म्हणजे ॲड. होर्तीकर. जतच्या राजकारणात ॲड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर व होर्तीकर कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच त्यांच्या वाढदिनी शुभेच्छा !
- राहुल संकपाळ