आर्थिक फसवेगिरी रोखण्यासाठी सायबर विभागाशी हातमिळवणी, देवेंद्र फडणवीसांचे GST विभागाला निर्देश
By संतोष भिसे | Published: November 10, 2022 03:11 PM2022-11-10T15:11:35+5:302022-11-10T15:14:44+5:30
Devendra Fadanvis : आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य जीएसटी विभागाचे अधिकारी आता सायबर सुरक्षा विभागाशी समन्वयाने काम करतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी तशा सूचना दिल्या.
- संतोष भिसे
सांगली - आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य जीएसटी विभागाचे अधिकारी आता सायबर सुरक्षा विभागाशी समन्वयाने काम करतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी तशा सूचना दिल्या.
फडणवीस यांच्याकडे गृह आणि वित्त विभाग आहेत. सोमवारी मुंबईत राज्य जीएसटी विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या विभागाकडून करचोरीविरोधात सुरु असलेल्या मोहिमांची महिती घेतली. बैठकीत सायबर गुन्हेगारीचाही विषय चर्चेत आला. करचुकवेगिरीसाठी अनेक व्यापारी, उद्योजक, आस्थापना सायबर गुन्हेगारी करतात. जीएसटीचा करभरणा पूर्णत: ऑनलाईन आहे. तो चुकविण्यासाठी बोगस कंपन्यांची स्थापना केल्याचे गेल्या काही वर्षांत सातत्याने उघडकीस आले आहे. बनावट बिले करुन त्याद्वारे जीएसटीचे बोगस परतावे मिळविल्याचेही उघडकीस आले आहे. याबाबतचे गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस व जीएसटी विभाग स्वंत्रपणे तपास करतात. फडणवीस यांनी सांगितली की, आर्थिक फसवेगिरी रोखण्यासाठी व या करचोरांना जाळ्यात पकडण्यासाठी जीएसटी विभागाने राज्याच्या सायबर सुरक्षा विभागाशी समन्वय राखून काम करावा.