देवेंद्र फडणवीसांच्या बोगस सहीने बदल्या, आदेश काढणाऱ्या आरोपीला मिरजेत अटक  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 11:35 AM2023-10-06T11:35:39+5:302023-10-06T12:02:51+5:30

मुंबई सायबर पोलिसांची कारवाई

Devendra Fadnavis fake signature transfers, the accused who issued the order was arrested in Miraj | देवेंद्र फडणवीसांच्या बोगस सहीने बदल्या, आदेश काढणाऱ्या आरोपीला मिरजेत अटक  

देवेंद्र फडणवीसांच्या बोगस सहीने बदल्या, आदेश काढणाऱ्या आरोपीला मिरजेत अटक  

googlenewsNext

मुंबई / मिरज : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचा ई-मेल हॅक करत महावितरण अधिकाऱ्यांचे बनावट बदली आदेश काढल्याचा धक्कादायक प्रकार राज्य सायबर विभागाच्या कारवाईत समोर आला. सायबर विभागाने या प्रकरणी मोहम्मद इलियास याकूब मोमीन (४०) याला मिरजमधून अटक केली.

मूळचा मिरजचा रहिवासी असलेला इलियास हा बीई इलेक्ट्रिकल इंजिनीअर असून, त्याने हे कृत्य एकट्याने केले असावे, असा अंदाज आहे. फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांच्या नावाचा गैरवापर करून ईमेल आयडी हॅक करून बनावट आदेश काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ अधिकाऱ्यांचे बनावट आदेश काढण्यात आलेले होते. विद्याधर महाले यांचा ईमेल आयडी हॅक करून बदलीसंदर्भात सूचना दिल्या गेल्या. त्यानंतर आदेश काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी बनावट आदेशांमार्फत पैसे उकळत होता. यामध्ये नेमका किती व्यवहार झाला आहे? किती जणांचा सहभाग आहे? याबाबत चौकशी सुरू आहे.

महावितरणचा बडतर्फ अभियंता 

मोमीन हा महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता होता. कनेक्शन देण्यासाठी लाच घेताना सापडल्याने त्यास बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर त्याने कंत्राटदार म्हणून काम सुरू केले होते. विजेचे कनेक्शन देतो म्हणून त्याने अनेकांकडून पैसे उकळल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. बुधवारी मिरजेत आलेल्या सायबर पोलिसांनी त्यास अटक करून मुंबईला नेले. या प्रकरणामुळे मिरजेत तसेच महावितरण विभागात खळबळ उडाली होती.

फडणवीसांची सही कॉपी पेस्ट केली

आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने बनावट पद्धतीने काढलेल्या बदली आदेशावर गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही कॉपी पेस्ट केल्याचेही समोर आले.

या अधिकाऱ्यांचे बनावट आदेश...

गणेश मुरलीधर असमर (उपकार्यकारी अभियंता), दुर्गेश जगताप (सहायक अभियंता), मनीष धोटे (सहायक अभियंता), यशवंत गायकवाड (सहायक अभियंता), ज्ञानोबा राठोड (सहायक अभियंता) आणि योगेश आहेर (सहायक अभियंता)

Web Title: Devendra Fadnavis fake signature transfers, the accused who issued the order was arrested in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.