‘बिरोबाच्या नावानं चांगभलंऽऽ, काशिलिंगाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या गजरात आरेवाडीत साडेतीन लाखावर भाविक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 06:08 PM2019-04-13T18:08:34+5:302019-04-13T18:09:59+5:30
ढोल-कैताळाच्या गजरात, सनईच्या निनादात भंडारा उधळीत ‘बिरोबाच्या नावानं चांगभलंऽऽ, काशिलिंगाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या गजरात आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवाची यात्रा साडेतीन लाखांवर भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात
ढालगाव : ढोल-कैताळाच्या गजरात, सनईच्या निनादात भंडारा उधळीत ‘बिरोबाच्या नावानं चांगभलंऽऽ, काशिलिंगाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या गजरात आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवाची यात्रा साडेतीन लाखांवर भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली.
महाराष्ट, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या आरेवाडी येथील बिरोबा देवाची यात्रा तीन दिवसांपासून सुरू होती. शुक्रवारी बिरोबा देवाच्या भक्ताला म्हणजेच सूर्याबाला खारा नैवेद्य दाखविण्यात आला. दर्शनासाठी सकाळपासूनच मंदिर परिसर फुलून गेला होता. दुपारनंतर खाºया नैवेद्यासाठी बनामध्ये मोठी गर्दी झाली होती. नैवेद्य दाखवून यात्रेची सांगता झाली.
यावर्षी यात्रा समिती व देवस्थान ट्रस्टने आरेवाडी तलावातून व नागज बंधाºयातून टेंभू योजनेचे पाणी शुद्ध करून मुबलक प्रमाणात दिले. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला. महांकाली साखर कारखान्याचे व काही भाविकांचेही टॅँकर पाणी पुरवठ्याचे काम करीत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी बंदोबस्त ठेवला होता. मात्र वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागजला मिरज-पंढरपूर राष्टय महामार्गावर सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सव्वाशे पोलीस कर्मचाºयांचा बंदोबस्त असला तरीही यात्रेत शिस्तीची कमतरता जाणवत होती.
ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा वैद्यकीय अधिकाºयांसह पस्तीस जणांचा ताफा पाणी निर्जंतुकीकरणासह रुग्णांना सेवा पुरवण्यासाठी सज्ज होता. यात्रेत सव्वातीनशे रुग्णांनी याचा लाभ घेतला. मुंबईच्या काही खासगी डॉक्टरांच्या पथकानेही मोफत वैद्यकीय सेवा दिली. वीज वितरण कंपनीकडून सलग तीन दिवस अखंडित वीजपुरवठा करण्याचे काम सहायक अभियंता व्ही. व्ही. वायफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्थेवर ताण पडला नाही.
सांगली विभागामार्फत ५२ बसेस सोडण्यात आल्याचे सहायक वाहतूक अधीक्षक बालाजी गायकवाड यांनी सांगितले. मात्र प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी एसटीची तात्पुरती निवारा शेड नव्हती. त्यामुळे गायकवाड स्वत: एसटीसेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांना आवाहन करीत होते. मात्र दरवर्षीप्रमाणे मिनी बस नसल्याने खासगी वाहतूकदारांंनीच भाविकांची ने-आण केली.
जीर्णोद्धार समितीचे कार्याध्यक्ष जयसिंग शेंडगे वगळता राजकीय नेत्यांनी यात्रेकडे पूर्ण पाठ फिरविली. श्री बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोळेकर, उपाध्यक्ष बिरू कोळेकर, सचिव जगन्नाथ कोळेकर, खजिनदार दाजी कोळेकर, विश्वस्त सचिन कोळेकर, आबा कोळेकर, औदुंबर कोळेकर, दत्तू कोळेकर, धोंडीराम कोळेकर, संतोष कोळेकर, नामदेव कोळेकर, पोलीसपाटील रामचंद्र पाटील यांच्यासह पुजारी, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी यांनी यात्रेसाठी विशेष परिश्रम घेतले.