बिबट्याच्या भीतीने शेतीशिवार पडले ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:55 AM2020-12-11T04:55:11+5:302020-12-11T04:55:11+5:30
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील सोनहिरा खोऱ्यात १५ दिवसांपासून बिबट्या आल्याच्या चर्चेने सर्वत्र दहशत पसरली आहे. डोंगरपायथ्याची शेतशिवारे ओस ...
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील सोनहिरा खोऱ्यात १५ दिवसांपासून बिबट्या आल्याच्या चर्चेने सर्वत्र दहशत पसरली आहे. डोंगरपायथ्याची शेतशिवारे ओस पडली आहेत. शेतावर कामांसाठी गेलेल्या महिलांसह पुरुष मंडळी ‘आला रे..... आला.. बिबटया आला...’ असे म्हणत बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती देत असल्याने, महिला-मुले शेतातील अर्धवट कामे सोडून गावाकडे परतत आहेत. गावा-गावातील तरुण मंडळी व वन कर्मचारी, शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आहेत की अन्य प्राण्यांचे, याची शहानिशा करण्यासाठी रानोमाळ फिरत आहेत.
आठ दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीपोटी शेतामध्ये कामे करण्यास कोणी धाडस करण्यास तयार नाही. ऐन शेतीकामाच्या लगबगीच्या दिवसात शेतशिवार ओस पडल्याचे चित्र देवराष्ट्रे, मोहित्यांचे वडगाव, आसद, चिंचणी परिसरात पाहावयास मिळत आहे. मागील महिन्यात सागरेश्वर अभयारण्यात वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट्याचे दर्शन झाले. यानंतर सागरेश्वर खिंडीत ताकारी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याजवळ आसद येथील विजय जाधव यांना बिबट्या दिसला. तेथे वन विभागाने पाहणी केली असता, बिबट्याचे ठसे उमटल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर चिंचणी येथील बसवराज कोळी व वाजेगाव येथील राकेश पाटणकर यांना वाजेगाव-पाडळी रस्त्याला चिंचणी हद्दीत सांबराचा पाठलाग करताना दोन बिबटे दिसले. त्यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
चौकट
वन विभागाला सांगायचीही भीती
बिबट्या किंवा त्याच्या पायाचे ठसे दिसताच ग्रामस्थ वन विभागाशी संपर्क साधतात. यावर वन कर्मचारी शहानिशा करतात. मात्र ज्यांनी बिबट्या पहिला, त्या लोकांकडून वन कर्मचारी बिबट्या पाहिल्याचे लेखी घेत आहेत. यामुळे आता वन विभागाला माहिती देण्यास नागरिक टाळाटाळ करू लागले आहेत.