मिरज पश्चिम भागातून ढबू मिरची नामशेष होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 03:34 PM2022-12-08T15:34:22+5:302022-12-08T15:34:45+5:30

दराची अनिश्चितता, रोगराईत वाढ

Dhabu Chili is on the verge of extinction from Miraj West | मिरज पश्चिम भागातून ढबू मिरची नामशेष होण्याच्या मार्गावर

मिरज पश्चिम भागातून ढबू मिरची नामशेष होण्याच्या मार्गावर

googlenewsNext

सचिन ढोले

समडोळी : बाजारपेठेतील दराची अनिश्चितता, हवामानातील बदल, निसर्गाचा असमतोल, रोगराईत वाढ, खते-औषधांचे दर व शेतमजुरीतील वाढ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या पार्श्वभूमीवर मिरज पश्चिम भागात नगदी पैसे मिळवून देणारे ढबू मिरचीचे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

दहा-पंधरा वर्षांपूर्वी समडोळी, दुधगाव, तुंग, मौजे डिग्रज, सावळवाडी, माळवाडी भागात उत्पादित होणाऱ्या ढबू मिरचीस प्रतिकिलो ५० रुपयांपासून २०० रुपये दर मिळत होता. आवक वाढल्यास तो ३० रुपयांपासून शंभरापर्यंत खाली येत असे. तथापि अलीकडे प्रत्येक वेळेस एकच भाजीपाल्याचे पीक घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे पिकाच्या जमिनी नापीक बनण्याचा धोका अधिक निर्माण झाला आहे. या भागामध्ये ढबू मिरची खालोखाल टमाटे, वांगी, गवारी, भेंडी ही भाजीपाल्याची नगदी पैसा मिळवून देणारी पिकेही घेतली जातात.

सध्या गुंतवणूक व मेहनतीच्या तुलनेत बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्याने बहुतांशी  शेतकऱ्यांनी रोटावेटर, जेसीबी लावून भाजीपाल्याची पिके नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे.

ढबू मिरचीचे दर तर खूपच पडले आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, सातारा, हैदराबाद व अन्य राज्यात जाणाऱ्या ढबू मिरचीत घट झाली आहे.

कर्जबाजारी होण्याची वेळ

कोरोनाच्या संकटात आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. पण नगदी पिके असणाऱ्या भाजीपाल्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये वाढ झाली होती. त्याचवेळी दळणवळणावर निर्बंध घातले गेल्याने नाशवंत भाजीपाला सडून गेला. त्यानंतर अवकाळी पाऊस, अतिवृष्टीचा फटका बसला. दर नसल्याने गुंतवणूक वाया गेली, परिणामी भाजीपाला उत्पादकावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे

Web Title: Dhabu Chili is on the verge of extinction from Miraj West

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.