Sangli News: पाणी चोरी प्रकरणामुळे ढालगाव ग्रामपंचायतीचे नुकसान; २५ लाख दंड वसूल करा, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 05:06 PM2023-01-24T17:06:11+5:302023-01-24T17:06:53+5:30
ग्रामपंचायतीने कायदेशीर मार्गाने कठोर कारवाई करावी, असा एकमुखी ठराव ग्रामसभेत मंजूर
ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील जलस्वराज्य योजनेचे पाणी चोरी प्रकरणामुळे ग्रामपंचायतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पाणी चोरांकडून २५ लाख रुपये दंड व व्याजाची रक्कम वसूल करा. या वसुलीसाठी ग्रामपंचायतीने कायदेशीर मार्गाने कठोर कारवाई करावी, असा एकमुखी ठराव ग्रामसभेत मंजूर केला.
ढालगाव येथे २०१७ पासून ही पाणीचोरी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामसभा बोलावली होती. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले.
ढालगावसाठी जीवनदायी असणाऱ्या जलस्वराज्य योजनेच्या मुख्य पाइपलाइनमधून पाणी चोरी प्रकरण उजेडात आले आहे. याबाबत ढालगाव ग्रामपंचायतीने कवठेमहांकाळ पोलिसांत फिर्याद दिली होती. ग्रामस्थांनी दोषींवर कठोर कारवाई करावी आणि दंडाची वसुली करावी, यासाठी तातडीची ग्रामसभा बोलावली होती.
यात आरोपीला दंडाची वसुली नोटीस पाठवावी व हा दंड वसूल करण्यासाठी कठोर कारवाई करावी, असा ठराव एकमताने मंजूर झाला. हा ठराव सागर झुरे यांनी मांडला तर अनुमोदन युवराज घागरे यांनी दिले. तसेच या पाणीचोरीला पाठीशी घालणाऱ्यांची चौकशी व्हावी, असाही ठराव माणिक देसाई यांनी मांडला. त्याला अनुमोदन सुरेश घागरे यांनी दिले. हे दोनच ठराव या ग्रामसभेत मंजूर केले.
सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे, मनोज पाटील यांच्यासह पोलिस बंदोबस्त होता. यावेळी भगवान वाघमारे, सरपंच मनीषा देसाई, उपसरपंच भीमराव घागरे, तम्माण्णा घागरे, जनार्दन देसाई, दिलावर मणेर, संजय घागरे, माधवराव देसाई, दिलीप झुरे आदी उपस्थित होते.