डम्परला माेटारीच्या धडकेत ढालगावच्या सासू-सून ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:30 AM2021-09-23T04:30:41+5:302021-09-23T04:30:41+5:30
फाेटाे २२०९२०२१ बेबीताई महामुनी, फाेटाे २२०९२०२१ अमिता महामुनी लाेकमत न्यूज नेटवर्क कवठेमहांकाळ/ढालगाव : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) ...
फाेटाे २२०९२०२१ बेबीताई महामुनी, फाेटाे २२०९२०२१ अमिता महामुनी
लाेकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ/ढालगाव : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील जॉली बोर्ड कारखान्यासमाेर रस्त्याकडेला उभ्या डम्परला माेटारीने मागून धडक दिल्याने सासू व सून जागीच ठार झाल्या. बेबीताई कुमार महामुनी (वय ६२) व अमिता शशिकांत महामुनी (३५, दोघी रा. ढालगाव, ता. कवठेमहांकाळ) अशी त्यांची नावे आहेत. अपघातात अमिता यांचे पती शशिकांत कुमार महामुनी (४०) गंभीर जखमी झाले, तर त्यांचा अकरा महिन्यांचा मुलगा ज्ञानदीप सुखरूप बचावला. मंगळवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली.
महामुनी कुटुंबीयांचा ढालगाव येथे सराफ व्यवसाय आहे. मंगळवारी शशिकांत महामुनी आई बेबीताई, पत्नी अमिता व अकरा महिन्यांचा मुलगा ज्ञानदीप यांना घेऊन सांगलीला बहिणीकडे गेले हाेते. तेथे जेवण करून रात्री सर्वजण माेटारीतून (क्र. एमएच १० बीएम ५९३७) ढालगावकडे परतत होते. शशिकांत माेटार चालवत हाेते. शिरढाेणजवळ जाॅली बोर्ड कारखान्यासमाेर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला दिलीप बिल्डकॉन कंपनीचा डम्पर (क्र. एमएच १० सीआर ६५१९) उभा होता. अंधारात डम्पर न दिसल्याने त्यांची माेटार पाठीमागून धडकली. अपघातात बेबीताई व अमिता महामुनी जागीच ठार झाल्या. शशिकांत महामुनी गंभीर जखमी झाले, तर त्यांचा अकरा महिन्याचा मुलगा ज्ञानदीप सुखरूप बचावला. जखमी शशिकांत यांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार करून घरी साेडण्यात आले. बुधवारी दुपारी मृत बेबीताई व अमिता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघाताची नाेंद कवठेमहांकाळ पाेलीस ठाण्यात झाली असून, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अक्षय ठिकणे अधिक तपास करीत आहेत.
चौकट
आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा
शशिकांत महामुनी यांचा नऊ महिन्याचा मुलगा ज्ञानदीप आईच्या मांडीवर सुखरूप होता. तो नवसाने झालेला एकुलता एक मुलगा आहे. पत्नी आणि आई ठार झाल्याने शशिकांत यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घरी कोणीच महिला नसल्याने ज्ञानदीपला कसे सांभाळायचे, असा प्रश्न शशिकांत यांच्यासमोर आहे.