Dhananjay Munde: भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, धनंजय मुंडेंच्या भाकिताने चर्चा तर होणारच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 09:56 AM2022-04-21T09:56:44+5:302022-04-21T09:57:41+5:30
धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंवर टिका करताना, आगामी काळात पक्ष संघटना वाढविण्याचेही भाष्य केले.
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादाचा थेट आरोप केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादीविरुद्ध मनसे असा सामना पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर मंत्री धनंजय मुंडेंनी सांगलीतील मेळाव्यात टिका केली. राज ठाकरे हे भाजपाचे अर्धवटराव आहेत. त्यामुळे ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले असा टोला मुंडेंनी लगावला होता. या सभेत बोलताना मुंडेंनी भाजपवरही टिका केली असून पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होईल, असे भाकितच केले आहे.
धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंवर टिका करताना, आगामी काळात पक्ष संघटना वाढविण्याचेही भाष्य केले. राज ठाकरे आज जे बोलतात ते उद्या त्यावर ठाम राहतीलच याची ग्वाही कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे अशा आरोपांना सामान्य जनता फारसे महत्त्वही देणार नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंभरहून अधिक आमदार निवडून येतील आणि भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असे भाकितच त्यांनी येथील सभेत केले. मुंडेंच्या या भाकितामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेमुळे धनंजय मुडेंना मनसेच्या नेत्यांकडून लक्ष्य केलं जात आहे. आमदार राजू पाटील, अमेय खोपकर आणि गजानन काळे यांनी टोला धनंजय मुंडेंना चांगलाचा टोला लगावला आहे.
मुंडेंची अवस्था पाहून 'करुणा'च येते
मनसे आमदार राजू पाटील म्हणाले की, धनंजयराव, चौकश्यांचा गंजलेला खिळा घुसल्यामुळे तुम्हाला झालेल्या धनुर्वातातून तर ही प्रतिक्रिया आली नाही ना? तुमच्या बुडाखाली काय जळतंय व टोचतंय याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे वायफळ बडबडीचा राग जरी येत असला तरी तुमची अशी अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते असं सांगत त्यांनी धनंजय मुंडेंवर बोचरी टीका केली आहे.
धनंजय मुंडेंना 5 कोटींची मागणी
मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान एका परिचित महिलेने धनंजय मुंडे यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन करून खंडणीची मागणी केली. या महिलेने आपल्याकडे पाच कोटी रुपयांचं दुकान आणि एक महागडं घड्याळ मागितल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच ही मागणी पूर्ण न झाल्यास बलात्काराची तक्रार करण्याची तसेच सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी या महिलेने दिल्याचेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.