आरक्षणाबाबत सरकारकडून राज्यात फसवणुकीचाच खेळ: धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 10:52 PM2018-12-09T22:52:44+5:302018-12-09T22:53:31+5:30
कवठेमहांकाळ : मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात कितपत टिकेल, याबद्दल शंका आहे. धनगर समाजाला अद्याप आरक्षण दिले नाही. त्यामुळे ...
कवठेमहांकाळ : मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात कितपत टिकेल, याबद्दल शंका आहे. धनगर समाजाला अद्याप आरक्षण दिले नाही. त्यामुळे आरक्षणाच्या नावाखाली सरकार या समाजबांधवांना फसवित आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नागज येथे केली.
नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आ. सुमनताई पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार प्रकाश शेंडगे उपस्थित होते.
मुंडे म्हणाले, या सरकारने देशातील जनतेला ‘अच्छे दिन’ची खोटी स्वप्ने दाखवली. काळे धन देशात आणले नाही, की १५ लाख रुपये प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर जमा झाले नाहीत. त्यामुळे हेच का ‘अच्छे दिन’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत एसटीचे आरक्षण देतो असे सांगितले होते; पण अशा अनेक बैठका होऊनही आरक्षण का दिले नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे.
ते म्हणाले, भाजप हा संघाच्या विचारावर चालणारा जातीवादी पक्ष आहे. त्यामुळे धनगर समाजाला हे सरकार आरक्षण देणार नाही. मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबद्दल शंका आहे. जर आरक्षण टिकले नाही, तर भाजप मराठा समाजाला फसवतोय, हे स्पष्ट होईल.
आ. सुमनताई पाटील म्हणाल्या, दोन महिने झाले तरी प्रशासन टँकर देत नाही, तलाव भरून देत नाही. प्रशासन आमच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. याला भाजप सरकार जबाबदार आहे. आज आबा असते तर ही परिस्थिती आली असती का?
प्रकाश शेंडगे म्हणाले, मराठा व ओबीसी यांच्यात भांडणे लावण्याचा भाजप सरकारचा डाव आहे.
भ्रष्ट मंत्र्यांना क्लीन चिट
राज्य सरकारमधील १६ मंत्र्यांनी घोटाळे केले आहेत, त्याचे पुरावेही मी दिले. परंतु त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्लीन चिट दिली. हे या सरकारचे महापाप आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.
खासदारांना घरी बसवा
मुंडे म्हणाले, तासगाव-कवठेमहांकाळमध्ये आता आर. आर. आबा नसल्याने जनतेच्या स्वप्नांचा चुराडा झाला. आबांचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही सुमनताई पाटील यांना ताकद द्या. या जिल्ह्यात पाण्याचे राजकारण केले जातेय. येथील खासदार पाण्याचे राजकारण करीत आहेत, ही खेदाची बाब आहे. त्यांना आता घरी बसविण्याची वेळ आली आहे.