धनगर आरक्षणाच्या ढाेलचा आवाज गावा-गावांत घुमवा - गोपीचंद पडळकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 12:34 PM2023-10-23T12:34:01+5:302023-10-23T12:35:54+5:30

हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेनेची घाेषणा

Dhangar Reservation will lay siege to Vidhan Bhavan in Nagpur on December 11 for reservation | धनगर आरक्षणाच्या ढाेलचा आवाज गावा-गावांत घुमवा - गोपीचंद पडळकर 

धनगर आरक्षणाच्या ढाेलचा आवाज गावा-गावांत घुमवा - गोपीचंद पडळकर 

कवठेमहांकाळ : धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. धनगरांच्या ढोलचा आवाज प्रत्येक गावात पोहोचला पाहिजे, राज्यात धनगर आरक्षणासाठी धनगर यात्रा सुरू असताना राज्यातील काही लाेकांनी विषपेरणी सुरू केली आहे. त्यांच्या नादाला लागू नका, आरक्षण मिळाल्याशिवाय धनगर समाज आता मागे हटणार नाही, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.

आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बनात बहुजनांचा दसरा मेळावा रविवारी पार पडला. यावेळी पडळकर बोलत होते. प्रारंभी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती एक मेंढपाळ बांधव व गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

पडळकर म्हणाले, शरद पवार मुख्यमंत्री असतानाच धनगर आरक्षणाचा प्रश्न मिटायला पाहिजे होता, पण त्यांनी जाणून-बुजून याकडे दुर्लक्ष केले. नंतरच्या काळात एकाही सरकारने याकडे लक्ष दिले नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना धनगर आरक्षण एसटीमध्ये व्हावे, यासाठी त्यांनी शपथपत्र जोडून दिले, पण नंतरच्या सरकारने काहीच केले नाही. धनगर आरक्षणासाठी २१ नोव्हेंबरला राज्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर आंदोलनसाठी बसणार आहोत, तर ११ डिसेंबरला नागपूर येथे विधानभवनाला लाखोंच्या संख्येने घेराव घालणार आहाेत.

यावेळी अनिकेत देशमुख, शिवानंद हैबदकर, दौलत शितोळे, डॉ. राजेंद्र खडे, बाळासाहेब कोळी यांची भाषणे झाली. दादासाहेब लवटे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, सुभाष खांडेकर, वसंत कोळेकर, रमेश कोळेकर, काशीलिंग कोळेकर, युवराज घागरे, अजित कोळेकर, उल्हास मलमे उपस्थित होते.

ताबडतोब समिती जाहीर करा

पडळकर म्हणाले, धनगर आरक्षणबाबत राज्य सरकारने दिलेली वेळ आता संपत आहे. राज्य सरकारने ताबडतोब समिती जाहीर करावी, धनगर समाज रस्त्यावर उतरला तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल. मेंढपाळासाठी शासनाने स्वतंत्र कायदा केला पाहिजे, कारण दिवसेंदिवस मेंढपाळावर हल्ले वाढत चालले आहेत. त्यांना संरक्षण मिळाले पाहिजे.

हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेनेची घाेषणा

मेळाव्यात गाेपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेना संघटना स्थापन करीत असल्याची घाेषणा केली, तसेच मेंढपाळांसाठी संत बाळूमामा संघटनेची घोषणा केली.

Web Title: Dhangar Reservation will lay siege to Vidhan Bhavan in Nagpur on December 11 for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.