चांदोलीजवळचा धनगरवाडा पिण्याच्या पाण्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:27 AM2021-05-26T04:27:05+5:302021-05-26T04:27:05+5:30
शिराळा : चांदोली धरणाजवळच्या मणदूरपैकी धनगरवाडा (ता. शिराळा) येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. दोनशे मीटरवर चांदोली राष्ट्रीय ...
शिराळा
: चांदोली धरणाजवळच्या मणदूरपैकी धनगरवाडा (ता. शिराळा) येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. दोनशे मीटरवर चांदोली राष्ट्रीय उद्यानातील बफर झोनमध्ये मुबलक पाण्याचा झरा आहे. मात्र, वन विभाग व निवी (जि. सातारा) ग्रामस्थांमुळे धनगरवाडा पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे.
चांदोलीच्या डोंगरदऱ्यात मणदूरपैकी धनगरवाडा व विनोबाग्राम अशा ४०० लोकसंख्या असणाऱ्या वाड्या आहेत. येथे पिण्याच्या पाण्यासाठी बफर झोनमध्ये मुबलक पाण्याचा झरा आहे. तो मणदूर गावच्या हद्दीत येत असल्यामुळे राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी धनगरवाड्यास पाणी देण्यास नकार देत आहेत. दुसऱ्या बाजूला निवी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याचा झरा आपल्या हद्दीत असल्याने धनगरवाड्यास पाणी देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
हा प्रश्न सोडविण्यासाठी २००२ मध्ये याच नैसर्गिक पाण्याचा स्रोत असलेल्या झऱ्यावरून धनगरवाड्यासाठी पाणी योजना सुरू केली होती, पण आठ दिवसांतच निवीच्या ग्रामस्थांनी योजनेची पाइपलाइन, मोटर, स्टार्टर असे साहित्य काढून टाकले. त्यामुळे ही योजना विस्कळीत झाली. पुन्हा २००७ मध्ये भारत निर्माण योजनेतून सोय केली; परंतु त्या योजनेचेही साहित्य चोरीला गेले. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.
२०१६-१७ या कालावधीत पाणी योजनेसाठी एक लाख ७८ हजार ५०० रुपये खर्चाची योजना मंजूर केली होती. योजनेचे काम सुरू असतानाच निवी ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते.
पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या धनगरवाडा ग्रामस्थांच्या प्रयत्नाकडे वन विभागाने दुर्लक्ष केले आहे. सातारा, सांगली जिल्ह्यातील हद्दी वन विभागाने निश्चित केलेल्या नाहीत.
सध्या येथे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या हातपंपावर पिण्याच्या पाण्याची योजना आहे. मात्र, हे पाणी अपुरे पडत असल्याने अर्धा किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. काही वेळा टँकरने पाणी आणावे लागते.
चौकट
शिशाच्या नैसर्गिक झऱ्यावरून पिण्याच्या पाण्याची योजना करून धनगरवाडा येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा.
-वसंत पाटील
सरपंच, मणदूर