धनगरी ढोलांचा मंत्रालयासमोर गजर करणार: शेंडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:15 PM2018-05-13T23:15:39+5:302018-05-13T23:15:39+5:30

Dhangri Dholla will be alarmed in front of ministry: Shendge | धनगरी ढोलांचा मंत्रालयासमोर गजर करणार: शेंडगे

धनगरी ढोलांचा मंत्रालयासमोर गजर करणार: शेंडगे

Next


सांगली : धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निकाली काढू, अशी ग्वाही विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. सरकारला जागे करण्यासाठी २२ मे रोजी मंत्रालयासमोर ‘धनगरी ढोल गर्जना आंदोलन’ करणार असल्याची माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिली.
शेंडगे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगली व सोलापूर येथील प्रचार सभेत धनगर समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती. आता चार वर्षे झाले तरी मोदींचे धनगर समाजाला अच्छे दिन पाहायला मिळालेले नाही. विधानसभेवेळी पंढरपूर ते बारामती अशी पदयात्रा काढून उपोषण केले. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनीही सत्तेत आल्यानंतर आरक्षण देण्याची घोषणा केली. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आम्हाला अभ्यासाची गरज नाही, आमचा अभ्यास पूर्ण झाल्याचेही ते म्हणाले होते. पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी पुन्हा अभ्यासासाठी समिती नियुक्त केली.
अभ्यास गटाच्या नावाखाली सरकार वेळकाढूपणा करीत आहे. या सरकारने धनगरांची फसवणूक केली आहे. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. भाजप सरकारने झोपेचे सोंग घेतले असून, त्याला जागे करण्यासाठी मंत्रालयासमोर २२ मे रोजी ‘धनगरी ढोल गर्जना आंदोलन’ करणार आहोत. या आंदोलनात ११ हजार ढोल वाजविणार असून, धनगर समाजाचे मठाधिपती, पुजारी सहभागी होणार आहेत. यातूनही सरकारला जाग न आल्यास २०१९ च्या निवडणुकीत भाजप सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
ढोलवादनाचा विक्रम
सध्या ढोलवादनाचा १३५६ जणांचा विश्वविक्रम आहे. या आंदोलनात सांगलीतून एक हजार, कोल्हापुरातून २ हजार ढोल सहभागी होणार आहेत. एकूण ११ हजार ढोल वादनाचे नियोजन केले असून, नवा विश्वविक्रमही करणार असल्याचे शेंडगे म्हणाले.

Web Title: Dhangri Dholla will be alarmed in front of ministry: Shendge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.